निश्चलनीकरण, आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर विकासकांकडून छोटय़ा घरांची निर्मिती

विकासकांनी मोठय़ा घरांऐवजी लहान घरांच्या बांधणीकडे मोर्चा वळवल्याचे आणि ग्राहकही परवडणाऱ्या घरांच्या खरेदीला प्राधान्य दिल्याचे वाशी येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता प्रदर्शनात दिसून आले. येत्या पाच वर्षांत खासगी व शासकीय अशी पाच लाख घरे महामुंबई क्षेत्रात बांधली जातील, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. बारा लाखांपासून हे घरे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत. यात नुकत्याच मंजूर झालेल्या ३७ किलोमीटर क्षेत्रफळाच्या नैना प्रकल्पाचा मोठा वाटा राहणार आहे. महामुंबई क्षेत्रात येत्या पाच वर्षांत किमान पाच लाख घरांची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रात नवी मुंबई, पनवेल, उरण या महामुंबई क्षेत्राला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. ३४४ चौरस किलोमीटरच्या या क्षेत्रात विमानतळ, मेट्रो, नैना, वरळी-न्हावा सागरी मार्ग, नेरुळ उरण रेल्वे, जलवाहतुक, पामबीच विस्तार, घणसोली विक्रोळी खाडीपूल, वाशी घणसोली व नवघर उरण समुद्री मार्ग, सायन्स सिटी, स्मार्ट सिटी, गोल्फ कोर्स, पनवेल रेल्वे टर्मिनस, यासारखे अनेक खासगी व शासकीय प्रकल्प येत आहेत. शीव-पनवेल सारखा १० पदरी महामार्ग वाहतुकीसाठी दोन वर्षांपूर्वी खुला झाला आहे. मुंबईला पर्याय ठरू पाहणाऱ्या या क्षेत्रात घर घेणाऱ्यांची संख्या इतर उपनगरांच्या तुलनेत जास्त आहे. या पाश्र्वभूमीवर देश विदेशातील ग्राहकांना व गुंतवणूकदारांना एकाच छताखाली हजारो मालमत्ता पाहण्याची संधी या मालमत्ता प्रदर्शनाच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. यात डिजिटल मार्केटिंगचा मोठा हातभार लागणार आहे. शुक्रवारपासून चार दिवस सुरू राहणाऱ्या या १७ व्या मालमत्ता प्रदर्शनाला पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी येत्या तीन दिवसांत ग्राहकांची नक्कीच गर्दी उसळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गत वर्षी चार लाख ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट दिल्याचे विकासकांच्या संघटनेने सांगितले.

मालमत्ता प्रदर्शनात माहिती घेणारा ग्राहक लागलीच घर आरक्षित करीत नाही, पण त्या निमित्ताने दोन-तीन वर्षांत घर घेण्याची त्याची प्रक्रिया सुरू होते, असे सहभागी व्यावसायिकांनी सांगितले. गेली दोन ते तीन वर्षे बांधकाम क्षेत्रात आर्थिक मंदी असताना मागील महिन्यापासून सुरू झालेल्या नोटाबंदीमुळे बांधकाम क्षेत्र अधिक गाळात रुतले आहे. त्यामुळे अनेक सवलती देऊनही ग्राहक घरे आरक्षित करत नसल्याचे दिसते. त्यामुळे प्रदर्शनाच्या निमित्ताने ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नोटाबंदीमुळे या प्रदर्शनाच्या आयोजनावरून विकासकांमध्ये दोन तट पडले आहेत, मात्र नोटाबंदी ही एक संधी असल्याची भूमिका काही विकासकांनी मांडली. नोटाबंदीमुळे बँकांमध्ये मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम जमा झाली आहे. त्याच फायदा घर घेणाऱ्या ग्राहकांना होण्याची शक्यता विकासक व्यक्त करीत आहेत. येत्या काळात व्याजाचे दर कमी झाल्यास भाडय़ाने घर घेणारे स्वस्तातले घर घेण्याचा विचार करू शकतील. त्यामुळे छोटय़ा घरांच्या निर्मितीकडे इंडियाबुल्स, गोदरेज, रहेजा, वाधवा, मॅरेथॉन, अरिहंत, नॅशनल, भूमिराज यांसारखे बडे विकासक वळले आहेत. नैना क्षेत्रात या विकासकांचे परवडणाऱ्या घरांचे बडे प्रकल्प येत आहेत. त्यात नैना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवल्याने ३७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा येत्या काळात झपाटय़ाने विकास होणार आहे. या भागासाठी सिडकोने पायाभूत सुविधांवर सातशे कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे महामुंबई क्षेत्रात येत्या पाच वर्षांत किमान पाच लाख घरांची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महामुंबई क्षेत्रात जमीन कमी उपलब्ध आहे. येत्या काळात साडेबारा टक्के योजनेतील भूखंडांचे वितरण आणि नैना क्षेत्राचा विकास पाहता बांधकामासाठी मोठय़ा प्रमाणात जमीन उपलब्ध होणार आहे. घरांची जास्त प्रमाणात निर्मिती झाल्यास दर कमी होतील. त्याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होणार आहे. घरांच्या या मेगानिर्मितीत सिडकोनेही ५५ हजार घरनिर्मितीचा प्रस्ताव तयार केल्याने महामुंबई क्षेत्रात अडीच हजार रुपये प्रति चौरस फुटापासून घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

नोटाबंदी हीच संधी आहे, हे ओळखून मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या नवी मुंबई हे घर खरेदी किंवा गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे घरातील गुंतवणूक ही चांगली गुंतवणूक मानली जाणार आहे. बँकांचे व्याजदर सात टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याने घर विकत घेणे सोयीचे होणार आहे. पनवेल क्षेत्रात कमी किमतीत खूप मोठय़ा प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहेत.  सिडकोने पायाभूत सुविधा देण्याची गरज आहे.

– देवांग त्रिवेदी, माजी अध्यक्ष, बिल्डर असोशिएशन नवी मुंबई

बडय़ा विकासकांना छोटी घरे बांधण्याशिवाय आता पर्याय नाही. मोठय़ा घरांच्या किमती मोठय़ा होत्या. त्यामुळे त्यात रोख आणि काळा पैसा असा ६०:४० व्यवहार चालत होता. आता काळा पैसा नसल्याने मोठी घरे विकण्यात अडचण येणार आहे. त्यात बँका कर्ज देण्यास तयार आहेत. ही सर्वसामान्यांना संधी आहे. त्यामुळे कोटय़वधी रुपयांची घरे तयार करणारे विकासकही आता छोटय़ा घरांचे प्रकल्प जाहीर करू लागले आहेत. नैना प्रकल्पामुळे घरनिर्मिती वाढणार असून त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.

– राजू गुप्ता, सनी रियल इस्टेट, वाशी

या मालमत्ता प्रदर्शनात खारघरमध्ये सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली. इथे मध्यमवर्गीयांपासून उच्चवर्गीयांपर्यंत सर्वासाठी घरे उपलब्ध आहेत.

– विनायक आयरे, कळंबोली

नवी मुंबई स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरात सुरू होणाऱ्या नव्या गृहप्रकल्पांबद्दल जाणून घेता आले. सर्व सुखसोयींनी युक्त अशा घरांची माहिती घेता आली. येत्या काळात प्रत्येकाला आपले स्वप्नातील घर घेता येईल.

रवी भोरे, कोपरखैरणे

विमानतळाची घोषणा झाल्यापासून पनवेलमधील घरांच्या किमती वाढल्या आहेत. या प्रदर्शनातून कमी किमतीची घरे उपलब्ध होतील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकालाही हक्काचे घर घेता येणार असेल, तर ही आनंदाची बाब आहे.

– संजय काजळे, नेरुळ

शहरात स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रदर्शनात १२ लाखांपासून ते १ कोटीच्या पुढे घरे उपलब्ध आहेत. त्यामुळे सामान्यतला सामान्य नागरिकसुद्धा घर घेऊ  शकेल.

– विशाल गुंजाळ, वाशी