पहिल्या टप्यासाठी पालिकेचा ८५ कोटींचा विकास आराखडा

आठ महिन्यांपूर्वी सिडकोकडून नवी मुंबई पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या शहरातील शेवटच्या घणसोली नोडसाठी पालिकेने पहिल्या टप्यासाठी ८५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला असून यात रस्ते, पदपथ, सुशोभीकरण, पथदिवे या नागरी सेवांबरोबरच रुग्णालय, बाजारहाटसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. पालिका आणि सिडको यांच्यातील हद्दीच्या वादात हस्तांतरण प्रक्रिया गेली अनेक वर्षे रखडली होती. त्यामुळे येथील नागरिकांना पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले होते. पावसाळ्यानंतर या भागातील अनेक नागरी कामांना सुरुवात होणार आहे.

नवी मुंबई शहर वसविताना सिडकोने एकूण १४ नोडचा विकास केला आहे. यातील सात नोड हे बेलापूर तालुक्यात आहेत. दिवा ते दिवाळ्यापर्यंत १०८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ पालिका हद्द आहे. यातील सहा नोड सिडकोने जून १९९४ नंतर टप्याटप्याने पालिकेला हस्तांतरित केले. यातील विक्रीयोग्य भूखंड मात्र सिडकोने अद्याप पालिकेला हस्तांतरित केलेले नाहीत. या साखलीतील शेवटचा नोड घणसोली डिसेंबर २०१६ रोजी माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नाने हस्तांतरित करून घेण्यात आला. त्यावेळी घणसोली नोडमधील अनेक नगरसेवकांनी या हस्तांतराला विरोध केला होता. सिडकोकडून हा नोड हस्तांतरित करून घेताना रस्ते, पाणी, वीज, ह्य़ा पायाभूत सुविधा तरी पूर्ण करून घ्याव्यात अशी या नगरसेवकांची मागणी होती. वाशीनंतर सर्वात मोठा असलेल्या या नोडवरील पायाभूत सुविद्यांसाठी किमान एक हजार कोटी रुपये तरी सिडकोकडून घेण्यात यावेत अशी अपेक्षा या नगरसेवकांची होती. यावरून घणसोलीतील नगरसेवकांमध्ये फूट पडली होती. येथील नव विकसित भागात आजमितीस रस्ते, पाणी, मलनिस्सासारण वाहिन्या नसल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ह्य़ा समस्या सोडविण्याच्या आश्वासनावरच येथील सहा नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळे नगरसेवकांची रहिवाशांच्या समस्यांचा सामना करताना अडचण होत होती.

घरांचे भाव वधारणार

सेक्टर २१ मधील पायाभूत सुविधांवर ११ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सिडकोने या नोड मधील पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने पालिकेला जनतेच्या आग्रहास्तव या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात नागरी कामे करावी लागणार आहे. या नोड मधून एक पावसाळी नाला खाडीकडे जात आहे. त्याचे सुशोभीकरणदेखील केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत केले जाणार आहे. काही प्रमाणात खाडी किनारा लाभलेल्या या भागातील सुविधांचा विकास झाल्यानंतर येथील नागरीकरण वाढणार असून घरांना चांगला भाव येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नवी मुंबई पालिकेने सिडकोकडून घणसोली नोड नुकताच हस्तांतरित करून घेतला आहे. येथील नागरिकांच्या पायाभूत सुविधांचा अभ्यास करून एक विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यातील पहिल्या टप्यातील कामांना लवकरच सुरुवात केली जाणार आहे. इतर नोडमध्ये असलेल्या सर्व सुविधा घणसोली नोडला देण्याचा पालिकेचा प्रयत्न राहणार आहे.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका