दिघ्यातील कारवाईमुळे शेकडो बेघर; मध्यस्थांकडून गैरफायदा; घरभाडे वधारले

दिघा येथील एमआयडीसी व सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या इमारती सील करण्यात आल्यामुळे आणि २००० नंतरच्या झोपडय़ांवर पालिकेने कारवाई सुरू केल्यामुळे दिघ्यातील अनेक रहिवासी एकाच वेळी बेघर झाले आहेत. हे सर्वजण भाडय़ाच्या घराच्या शोधात असल्यामुळे दिघा परिसरातील घरांचे भाडे वधारले आहे. घर शोधून देणारे मध्यस्थही अधिकाधिक कमिशनची मागणी करून या बेघर रहिवाशांच्या गरजेचा गैरफायदा घेऊ लागले आहेत.

एकीकडे दिघा येथील एमआयडीसी व सिडकोच्या भूखंडावरील बेकायदा इमारती सील करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार २००० नंतरच्या झोपडपट्टय़ांवर कारवाई करण्यात येत आहे. परिणामी दिघ्यातील अनेक रहिवासी बेघर झाले आहेत. त्यांची परिसरात परवडणाऱ्या भाडय़ात घर शोधण्यासाठी धावपळ सुरू आहे.

सील केलेल्या इमारती

या आठवडय़ात एमआयडीसीच्या भूखंडावरील मोरेश्वर, भगतजी व पांडुरंग या इमारती कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यातून एमआयडीसीच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. या इमारतींतील सुमारे ६० कुटुंबे बेघर झाली आहेत.

जवळपासच्या भागांत शोधाशोध

दिघ्यातील नागरिक कळवा, विटावा, खारेगाव, ऐरोली, घणसोली, गोठीवली येथे भाडय़ाचे घर शोधत आहेत. बेघर झाल्यामुळे तातडीने घर मिळवण्याची त्यांची निकड लक्षात घेऊन दलाल त्यांचा गैरफायदा घेऊ लागले आहेत. सामान्य दरांपेक्षा जास्त दलाली वसूल केली जात आहे. भाडेतत्त्वावर घर देणाऱ्यांनीही भाडे वाढवले आहे.

झोपडपट्टीवरील कारवाई

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी २००० नंतरच्या झोपडपट्टीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यादवनगरमधील सुमारे ७०० पेक्षा अधिक झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. तेथील रहिवासीही भाडय़ाच्या घरांच्या शोधात आहेत.

घरावर कारवाई होणार असल्याने भाडय़ाच्या घराचा शोध सुरू आहेत. पण दलालाकडून ११ महिन्यांच्या करारामधील एक भाडे आकरण्यात येत आहे. भाडय़ाचे दरदेखील वाढवण्यात आले आहेत. आमच्या गरजेचा गैरफायदा घेतला जात आहे.

– छाया जाधव, रहिवासी

लवकरच कारवाई होणाऱ्या इमारती

सिडकोच्या अन्य चार भूखंडांवरील इमारतींवर या आठवडय़ात होणारी कारवाई पोलीस बंदोबस्ताअभावी लांबणीवर पडली आहे. तरीही या इमारतीतील १५० पेक्षा अधिक कुटुंबे बेघर होण्याच्या वाटेवर आहेत. तर एमआयडीसीच्या भूखंडावरील कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात असणाऱ्या सीताराम पार्क, नाना पार्क, कल्पना हाइट्स यांनादेखील लवकरच नोटीस बजावली जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.