केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन दलातील जवानांकडून शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर नवी मुंबई पालिकेने आपल्या शाळांतील ३५ हजार विद्यार्थ्यांना नैसर्गिक व मानवी आपत्तीचा सामना करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्वप्रथम पालिकेच्या ७० शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापकांना दोन दिवसांचे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले गेले आहे. हे शिक्षक पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणार आहेत.

केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन दलातील जवानांच्या माध्यमातून पालिकेच्या ७० शाळांचे मुख्याध्यापक आणि प्रत्येक शाळेतील दोन शिक्षकांना दोनदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. यात आग, अतिवृष्टी, चेंगराचेंगरी, मैदानावरील अपघात, वादळ, वारा यांसारख्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या व्यवस्थापनाचा समावेश आहे. याची रंगीत तालीमदेखील घेण्यात आली आहे. पालिकेच्या २०० शिक्षकांनी हे दोनदिवसीय प्रशिक्षण घेतले असून हे शिक्षक नंतर विद्यार्थ्यांना याचे धडे देणार आहेत.

प्रत्येक शाळेत आग्निशम उपकरणे ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून ती कशी वापरावीत, याचे धडे विद्यार्थी गिरवणार आहेत. शाळेत किमान वाळूने भरलेल्या बादल्या ठेवण्यास सांगण्यात आले आहे. १३ वर्षांपूर्वी तामिळनाडूत कुंभकोणम येथील एका शाळेत आग लागल्याने ९४ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरवल्यास आपत्तीकाळातील नुकसानाची तीव्रता कमी करता येणे शक्य होणार आहे. अतिवृष्टी, चेंगराचेंगरी, बॉम्बस्फोट अशा आपत्ती ओढावल्यास स्वतचे व इतरांचे जीव वाचवण्यास विद्यार्थी सक्षम होतील.

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांला देणे आवश्यक आहे. त्याची सुरुवात पालिकेच्या ३५ हजार विद्यार्थ्यांपासून होणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाकडून पालिका शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ते शिक्षक आता विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत.

– संदीप सांगवे, शिक्षणाधिकारी, नवी मुंबई पालिका