नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कडक शिस्तीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची आयुक्तपदी नियुक्ती केल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही वर्षांपूर्वी कोल्हापूरवासीयांनी मुंडे यांची बदली रद्द करण्यासाठी जनआंदोलन उभारले होते. शुक्रवारी जलशिवार अभियानाचे सोलापूर जिल्ह्य़ातील सर्वोत्तम अधिकारी पुरस्कार स्वीकारलेल्या मुंडे यांना नवी मुंबईत सध्या गहिरे झालेल्या पाणीटंचाईवर मात करावी लागणार आहे.
दोन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असणाऱ्या नवी मुंबईची मागील काही वर्षांत आर्थिक घडी विस्कटली होती. त्यामुळे मावळते आयुक्त दिनेश वाघमारे यांनी कोणताही नवीन प्रकल्प न घेता जुन्या प्रकल्पांवर ‘नजर’ ठेवण्याचे काम केले. सव्वा वर्षांची वाघमारे यांची कारकीर्द प्रभावी ठरली नाही. थेट आयएएस असलेले वाघमारे राजकीय दबावाला अनेक वेळा बळी पडल्याचे दिसून येते. त्यामुळे केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीला नवी मुंबईला टाटा करण्याची वेळ आली तर मार्जिनल स्पेस हॉटेलमालकांना देण्यात यावी हा स्वत:चा निर्णय रद्द करण्याची नामुश्की वाघमारे यांच्यावर आल्याने ते वाघासारखा दबदबा निर्माण करू शकले नाहीत असे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या जागी येणाऱ्या मुंडे यांच्याकडून शहरवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी स्वच्छतेसाठी केलेल्या वेगळ्या उपाययोजनांमुळे त्यांच्या नावाचा स्वच्छता पॅटर्न तयार झाला आहे. नियोजनबद्ध शहर असलेल्या नवी मुंबईत स्वच्छतेचे फारसे प्रयोग करावे लागणार नाहीत, पण पालिकेत गेली अनेक वर्षे आलेली मरगळ, भ्रष्टाचार, टक्केवारी यांची स्वच्छता करण्याचे मोठे काम मुंडे यांना करावे लागणार आहे. त्यामुळे सिडकोची मलिन झालेली प्रतिमा पुन्हा स्वच्छ करण्याचे संजय भाटिया यांनी केलेल्या कामाप्रमाणे मुंडे यांना हे मिशन करावे लागणार असल्याचे बोलले जाते. मुंबई पालिकेनंतर स्वत:चे धरण घेऊनही आता पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आलेल्या मोरबे धरणातील पाणी कुठे मुरले आहे त्याचा शोध नवीन आयुक्तांना घ्यावा लागणार आहे. सोलापूर जिल्हय़ात पाणी योजनांची चांगली अंमलबजावणी करणाऱ्या मुंडे यांना नवी मुंबईतील पाणी योजना रुळावर आणावी लागणार आहे. त्याचप्रमाणे सीईटीपीमधील पाण्याला अद्याप ग्राहक मिळत नाही किंवा हे पाणी शहरातील जलसंपदेलाही वापरता येत नाही. त्या पाण्याचा योग्य निचरा करावा लागणार आहे.