गेली दीड वर्षे रिक्त असलेल्या नवी मुंबई जिल्हाप्रमुख पदावरील नियुक्तीच्या हालचाली काही दिवसापासून सुरू झाल्याने नवी मुंबई शिवसेनेते जुने आणि नवीन असा वाद उफाळून आला आहे. माजी जिल्हाप्रमुख विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना जाधव खून खटल्यात दिलासा मिळाल्याने त्यांनी हे पद पुन्हा मिळावे यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नुकतीच त्यांनी शिवसेनेचे काही नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांना गोवा दर्शन घडवून आणले. चौगुले सक्रिय झाल्यामुळे या स्पर्धेतील इतर स्पर्धकांनी आपल्या परीने मोर्चबांधणीला सुरुवात केली आहे.
नवी मुंबई शिवसेनेला गेली अनेक वर्षे भक्कम नेतृत्व मिळालेले नाही. त्यामुळे वीस वर्षांपूर्वी  पालिका ताब्यात असलेल्या पक्षाची नंतर बरीच पडझड झाली. त्यानंतर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत आलेल्या विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यामुळे सेनेने ऐरोलीत मुसंडी मारली आहे.
त्यामुळे त्यांना पक्षाला उभारी देण्यासाठी जिल्हाप्रमुख पद देण्यात आले होते. त्यांना गतवर्षी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केल्याने त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजिनामा देण्यास भाग सांगितले. हे राजकीय षड्यंत्र असल्याचे त्यांनी सांगून पाहिले पण निर्दोषत्व सिद्ध करण्याचा सल्ला मातोश्रीने दिला.
तेव्हापासून हे पद रिकामे असून कोणाचा पायपोस कोणात नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच नुकतेच स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांनी पक्षश्रेष्ठींना न विचारता महत्त्वाची असलेल्या समितीची सभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली होती. त्यामुळे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकावर नियंत्रण ठेवणाऱ्या जिल्हाप्रमुख पदाची नियुक्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी शिवसैनिकांची मागणी आहे. चौगुले यांच्यावर असलेल्या बलात्कार व खुनाच्या आरोपात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना नुकताच दिलासा दिला आहे.
त्यामुळे संघटनात्मक दृष्टय़ा महत्त्वाचे असलेले हे पद पुन्हा मिळावे यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या पदाचा त्यांना राजिनामा द्यावा लागल्याने एक प्रकारे त्यांचा अवमान झाला होता. त्यामुळे हे पद त्यांना पुन्हा सन्मानाने परत हवे आहे.
चौगुले यांनी या पदासाठी प्रयत्न सुरू केल्याने त्यांचे स्पर्धेक ऐरोलीतील नगरसेवक एम. के. मढवी यांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून मढवी जिल्हाप्रमुख, विरोधी पक्षनेते आणि पुढील ऐरोली विधानसभा निवडणुक या तीनही प्रमुख पदांच्या उमेदवाराचे दावेदार आहेत.

याच स्पर्धेत वाशीतील नगरसेवक किशोर पाटकर, ज्येष्ठ माजी नगरसेवक विठ्ठल मोरे, कामगार नेते मनोहर गायखे यांच्या नावाचा विचार केला जात आहे. चौगुले यांना जिल्हाप्रमुखपद पुन्हा दिले गेल्यास त्यांचे रिक्त होणारे विरोधी पक्षनेते पदावर पाटकर यांचा दावा आहे. यातील पाटकर, मढवी हे पक्षात नवीन असल्याने या नगरसेवकांना हे महत्त्वाचे पद देण्यास जुन्या शिवसैनिकांचा विरोध असून पक्ष चालविण्यासाठी लागणारे ‘गुण’ असल्यास नवीन इच्छुकांना हे पद देण्यास हरकत काय असा सवाल काही शिवसैनिक उपस्थित करीत आहेत.