मंगळवारी होणाऱ्या महासभेत निर्णय

शिस्तप्रियता आणि निर्णयांची धडाडी यांमुळे एकीकडे नवी मुंबईकरांच्या गळय़ातील ताईत ठरलेले नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक कारभाराला विरोध करत स्थायी समितीच्या १४ सदस्यांनी त्यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव दाखल करून घेण्यात आला आहे. येत्या मंगळवारी होणाऱ्या महापालिकेच्या विशेष महासभेत या ठरावावर चर्चा व मतदान होण्याची शक्यता आहे.

तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून महापालिकेच्या प्रशासकीय कारभाराला एकप्रकारची शिस्त आणली. त्याचबरोबर मुंढे यांनी काही महत्त्वाचे निर्णयही घेतले. परंतु, हे निर्णय एकतर्फी तसेच लोकप्रतिनिधींनी विश्वासात न घेता घेतल्याचा आरोप करत विविध राजकीय पक्षांनी सुरुवातीपासूनच त्यांना विरोध सुरू केला होता. अलिकडच्या काळात हा संघर्ष आणखी उफाळून आला असून आयुक्तांच्या कारभाराने नाराज झालेले महापौर सुधाकर सोनावणे यांनी ‘पालिका मुख्यालयात पाऊल ठेवणार नाही’ असा निर्धार केला होता.  या पाश्र्वभूमीवर मुंढे यांच्याविरोधात हा अविश्वास ठराव येत आहे. ठराव आणण्यासाठी स्थायी समितीच्या १४ सदस्यांनी दिलेले पत्र महापौर सोनावणे यांनी गुरुवारी पालिकेच्या सचिवांकडे सोपवले. मंगळवारी २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अविश्वासाच्या ठरावावर सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी या पत्रावर सहय़ा केल्या आहे; मात्र भाजप अविश्वास ठरावाच्या विरोधात आहे. शुक्रवारी मुंढे यांच्यासमोर शिवसेनेचे नगरसेवक व स्थायी समिती सभापती शिवराम पाटील यांच्याविरोधात बेकायदा बांधकामप्रकरणी सुनावणी होणार असल्याने या प्रस्तावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. नऊ नगरसेवकांचे भवितव्यही या सुनावणीत निश्चित होणार आहे.