शाळांत जनजागृती; फटाके विक्रीची परवानगी न मिळाल्याने विक्रेत्यांत संभ्रम

दिवाळी म्हणजे दुपारचे काही तास वगळता पूर्ण वेळ फटाक्यांचा दणदणाट, हे काही वर्षांपूर्वीचे चित्र आता बदलू लागले आहे. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाविषयी शाळा-शाळांत, प्रसार आणि समाज माध्यमांतून होणाऱ्या जनजागृतीमुळे गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबईतील फटाक्यांचे प्रमाण घटले आहे. यंदा तर अद्याप पोलीस, पालिका आणि अग्निशमन दलाने फटाके विक्रीच्या परवानग्याच न दिल्यामुळे विक्रेते संभ्रमात आहेत. त्यामुळे यंदा नवी मुंबईकरांना दिवाळीतील प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

दिवाळी म्हणजे फटाके विक्रेत्यांचा कमाईचा काळ. त्यामुळे फटाके विक्रेत्यांनी नवी मुंबईत ठिकठिकाणी भाडय़ाने जागा घेऊन स्टॉल बांधण्यास सुरुवात केली आहे, मात्र दिवाळी तोंडावर आली असूनही अद्याप पालिका, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या परवानग्या न मिळाल्यामुळे विक्रेते संभ्रमात आहेत.

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव नियमांच्या चौकटीत साजरा झाल्यानंतर आता दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषणही नियमांनी मर्यादित ठेवण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. महापालिकेचा अतिक्रमण विभाग, पोलीस, आणि वाहतूक विभागाने फटाके व फराळाच्या स्टॉल्समुळे रहदारीत अडथळा येऊ नये म्हणून खबरदारी घेतली आहे. फटाक्यांचे स्टॉल्स गर्दीच्या आणि रहदारीच्या ठिकाणी असल्यास आग लागून अपघात होण्याची शक्यता विचारा घेता त्यांची विक्री मैदानातच करण्यात यावी, असा नियम आहे. त्यामुळे विक्रेते फटाके विक्रीसाठी योग्य जागेच्या शोधात आहेत. तात्पुरत्या स्टॉलसाठी पालिका परवाना शुल्क, जागा भाडे व अनामत रक्कम स्वीकारते. फटाके ज्वलनशील असल्यामुळे फटाक्यांच्या प्रत्येक स्टॉलमध्ये अग्निशमनाची व्यवस्था असावी असा नियम आहे. हजारो फटाके विक्रेत्यांनी पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केले आहेत, मात्र अद्याप प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे.

शहरात शाळाशाळांत फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाविषयी जनजागृती केली जात आहे. फटाके वाजवणार नसल्याची शपथ विद्यार्थी घेत आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून फटाका विक्री कमी होऊ लागली आहे. यंदा तर अद्याप फटाका विक्रीबाबतच साशंकता आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना यंदा दिवाळीतील प्रदूषणापासून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

शहरातील फटाका विक्रीबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. शासनाच्या निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. आमच्याकडे तात्पुरत्या फटाका व्रिकी स्टॉलच्या परवानगीसाठी अर्ज आले आहेत. परंतु अद्याप कोणालाही परवानगी दिलेली नाही.

डॉ. सुधाकर पाठारे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १ 

हायकोर्टाच्या आदेशानुसार रहिवासी क्षेत्रात तात्पुरते फटाका विक्री स्टॉल लावण्यासच परवानगी नाही. शहरात फटाका विक्री करू द्यायची की नाही याबाबत लवकरच शासन निर्णय घेईल आणि कार्यवाही करण्यात येईल.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

शहरात फटाका विक्रीबाबत सगळीकडेच संभ्रम आहे. होलसेल फटाके विक्रेत्यांना मार्चमध्येच परवाने दिले आहेत. त्यामुळे त्यांनी लाखो रुपयांचा माल भरला आहे. फटाका विक्रीची परवानगी नाकारल्यास आमचे मोठे नुकसान होईल. दिवाळी चार दिवसांवर आली आहे. त्यामुळे काय होणार याकडे आमचे लक्ष लागले आहे.

प्रसाद पाटील, अवधूत फायरवर्क्‍स, नवी मुंबई