दिवाळीच्या मुहूर्तावर घर घेतले, संसार थाटला, सारे काही चांगले चालले होते. मात्र आपली फसवणूक झाल्याची जाणीवही अनेकांना नव्हती. आता डोक्यावरचे छप्परच गेल्याने यंदाची दिवाळी दु:खीच ठरली आहे. दिघ्यातील अनेक कुटुंबांमध्ये सध्या ही परिस्थिती आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा परिसरात अनेक कुटुंबे राहण्यासाठी आली. कोणी स्वस्त घर मिळेल या आशेने आपले घर विकून आले, तर कोणी कर्ज काढून आपल्या स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी दिघा गाठले. मिळेल त्या जागी गगनचुंबी इमारतीत आपले संसारही थाटले. तर, कोणी पोटाची खळगी भरण्यासाठी दुकानेदेखील विकत घेऊन जीवनाचा गाडा सुरू केला. मात्र ही बांधकामे अनधिकृत ठरल्याने व नंतर ती पाडण्याच्या न्यायालयाच्या आदेशामुळे हजारो उंबरठे हादरले.
दिघा परिसरात एमआयडीसी, सिडकोच्या जमिनीवर अनधिकृतपणे इमारती उभ्या राहिल्या असून अशा ९४ इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पहिल्या टप्प्यात केरूप्लाझा, शिवराम व पार्वती अपार्टमेंट या निवासी इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. सध्याच्या उत्सवी काळात या कारवाईला स्थगिती देण्यात आली असून दिवाळीनंतर ही कारवाई पुन्हा सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने सिडको व एमआयडीसीला दिले आहेत. त्यामुळे येथील भयभीत नागरिकांनी यंदा दिवाळीचा दिवा न पेटवण्याचा निर्णय घेतला आहे.