नवी मुंबई, पनवेल परिसरातले धबधबे, खाडी किनारे आणि अन्य पर्यटनस्थळांवर सामिष भोजन, मद्यपान आणि मौजमस्ती करण्याच्या विचारात असाल, तर सावधान. मद्यपान करून वाहन चालविणे, निशिद्ध क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करणे किंवा अन्य नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. नियम मोडणाऱ्यांवर नवी मुंबई आणि पनवेल पोलिसांची तसेच वाहतूक पोलिसांची करडी नजर राहणार आहे. तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी शनिवार आणि रविवारी ठिकठिकाणी नाकाबंदीही करण्यात येणार आहे.

नवी मुंबईत पांडवकडा, गवळीदेव आणि खाडी किनाऱ्यांवर गटारी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. शहराच्या पूर्वेला डोंगराळ भाग आहे, तर पश्चिमेला आहे. त्यामुळे गटारीच्या सुमारास तिथे तळीरामांचे अड्डे जमतात. मद्याच्या नशेत अपघात होऊ नयेत म्हणून नवी मुंबईत ठिकठिकाणी नाकांबदी करण्यात येणार आहे. वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शहरातील भेसळयुक्त दारू, अनधिकृत चायनीज कॉर्नरवर आणि रस्त्यावर खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्यांवर पोलीस, अन्न आणि औषध प्रशासनाची नजर राहील.

शहरातील पर्यटनस्थळांवर मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या रेस्टॉरन्ट व बारमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांची करडी नजर असणार आहे. मद्यपान करून वाहन चालवताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल. शुक्रवारी रात्रीपासून रविवापर्यंत बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.  – नितीन पवार, पोलीस उपआयुक्त, नवी मुंबई वाहतूक शाखा