सत्याग्रहाची साक्ष देणाऱ्या भूमीवर मद्याच्या बाटल्या आणि कचरा 

१९३०च्या स्वातंत्र्य लढय़ात ब्रिटिशविरोधात लढा देताना झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहात अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. त्या रणसंग्रामाचा साक्षीदार चिरनेर येथील अक्कादेवीचा परिसर आहे. पण पावसाळी पर्यटनाला पेव फुटले असताना येथील बंधाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून मात्र या पवित्र भूमीचे पावित्र्य भंग करण्याचा प्रकार सुरू आहे. येथील पारावर दारू मटणांच्या पाटर्य़ाबरोबर कचरा आणि मद्याच्या बाटल्या अस्ताव्यस्त टाकल्याने स्थानिकांना त्याचा त्रास सहन होतआहे.

चिरनेरच्या अक्कादेवी परिसरात रविवारी मोठय़ा संख्येने पर्यटकांची हजेरी होती. यात तरुण वर्ग विशेष करून होता. या वेळी येथील आदिवासी वाडीतील प्राथमिक शाळेसमोरील पारावरच नाच गाणी आणि मद्यांचे पेग रिचवत त्यांचा धिंगाणा सुरू होता. त्यामुळे स्वातंत्र्यलढय़ातील गौरवशाली  त्यागाची, येथील शेतकरी, आदिवासी यांनी केलेल्या बलिदानाचे प्रतीक असलेल्या अक्कादेवीचे पावित्र्य भंग पावत असल्याची भावना येथील स्थानिकांमध्ये आहे. त्यामुळे पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेले हे प्रकार थांबविण्याची मागणी आता होत आहे.

चिरनेर परिसरात पर्यटकांची गर्दी

पावसाळा सुरू झाला की पावसाळी पर्यटनात वाढ होते. मग सुट्टीच्या दिवशी परिसरातील पर्यटन स्थळांवर गर्दी पाहावयास मिळते. चिरनेरसारख्या निसर्गरम्य परिसरात अक्कादेवीचा बंधारादेखील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. हा बंधारा पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहत असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. यात रायगडसह नवी मुंबई तसेच मुंबईतील पर्यटकांचादेखील समावेश आहे.

स्वातंत्र्यलढय़ातील या भूमीचे पावित्र्य राखता येईल, यासंदर्भात पोलीस, प्रशासकीय अधिकारी तसेच ग्रामपंचायतींना पत्र लिहून दक्षता घेण्याची विनंती करणार आहे.

– संदीप खोमणे, नायब तहसीलदार, उरण.