जेएनपीटी बंदरातील पहिले खासगी बंदर असलेल्या दुबई वर्ल्ड पोर्ट (डीपी वर्ल्ड)मधील कामगारांनी सोमवारपासून विविध मागण्यांसाठी करळ फाटा येथे आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात १७०पेक्षा अधिक कामगारांचे कुटुंबीय तसेच उरणमधील राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. कामगारांना संघटना करण्याचा अधिकार तसेच वेतनवाढ या दोन प्रमुख मागण्या या कामगारांनी केल्या आहेत.

ँखासगी बंदर असलेल्या पूर्वाश्रमीच्या पी अ‍ॅण्ड ओ म्हणजेच सध्याच्या दुबई पोर्ट वर्ल्डमधील कामगारांना व्यवस्थापनाने सामावून घेतले आहे. या कामगारांनी आपल्या हक्कांसाठी न्हावा शेवा स्टाफ असोसिएशनची स्थापना केली आहे. या संघटनेला व्यवस्थापनाने मान्यता देऊन कामगारांच्या वेतन कराराची चर्चा करावी, अशी मागणी या असोसिएशनने केली होती. या संदर्भात व्यवस्थापनाला वारंवार सूचना देऊनही व्यवस्थापनाने असोसिएशनसोबत चर्चा करण्यास व असोसिएशनला मान्यता देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे व्यवस्थापनाने असोसिएशनची स्थापना होताच त्यांच्या सदस्यांची बदली करण्याचे सत्र सुरू केले आहे. डीपी वर्ल्डमधील सर्व कामगार हे भूमिपुत्र असून उरण बंदरातील जेएनपीटीअंतर्गत कामगार संघटनेचे भूषण पाटील, जेएनपीटी जनरल संघटनेचे सुरेश पाटील, सामाजिक संघटनेचे संतोष पवार तसेच इतर कामगार संघटनांचे नेते तसेच उरणमधील सर्व राजकीय व सामाजिक संघटनांसह हे आंदोलन सुरू केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष किशोर भोईर यांनी दिली.