महापालिका निवडणुकीचा प्रचार

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे  मंत्री एकनाथ शिंदे व सेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी शुक्रवारी काढलेली दुचाकी फेरी वादाच्या फेऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत.  दुचाकी चालविणाऱ्या मंत्र्यांनी हेल्मेट न घातल्याने वाहतूक नियम फक्त सामान्यांच्या वाहनांपुरते मर्यादित आहेत का, असा प्रश्न सामान्य पनवेलकरांना पडला आहे.

खारघर येथून सुमारे अडीचशे दुचाकी व वाहनांचा ताफा घेऊन  शिंदे आणि बांदेकर यांच्या फेरी निघाली होती. यामध्ये एकाही शिवसैनिकाने हेल्मेट  घातले नव्हते. वाहतूक विभागाला याबाबत विचारल्यावर त्यांनी हात वर केले. वाहतूक विभागाची परवानगी बेलापूर येथील पोलीस उपायुक्त (वाहतूक, नवी मुंबई) यांच्याकडून थेट दिली जात असल्याचे सांगण्यात आले.  शिंदे यांनी काढलेल्या शुक्रवारच्या दुचाकी फेरीला वाहतूक विभागाची परवानगी होती का, याबाबत विचारल्यावर नक्की नियमभंग झाल्यास नक्की कारवाई करू, असे उत्तर पोलिसांनी दिले.शिंदे यांनी खारघर येथून निघताना बुलेट चालविली तसेच कळंबोलीपर्यंत फेरी आल्यानंतर त्यांनी खुल्या जीपमधून प्रवास केला. एकनाथ शिंदे व बांदेकर पनवेल पालिकेवर सेनेची सत्ता आणण्यासाठी  तळ ठोकून आहेत. शुक्रवारच्या दुचाकी फेरीने केलेल्या नियमभंगावर नवी मुंबई पोलीस मंत्र्यांकडून दंडाची पावती आकारतात का याकडे सामान्यांचे लक्ष आहे. या फेरीला स्थानिक पोलीस विभागाची परवानगी असल्याचे सांगण्यात येते. मात्र नवी मुंबई वाहतूक विभागाची परवानगी सेनेने काढली होती का याचे स्पष्टीकरण वाहतूक पोलीस देऊ शकले नाही.

निवडणुकीच्या प्रचार फेरीची व दुचाकी फेरीची थेट परवानगी बेलापूर येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयातून काढली जाते. शुक्रवारी मी कार्यालयात नव्हतो. एकनाथ शिंदे यांनी हेल्मेट न घालता दुचाकी चालविली असल्यास त्यावर नक्की कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जाईल. नियम हे सर्वाना सारखेच आहेत.  – प्रवीण पांडे, खारघर वाहतूक विभाग, पोलीस अधिकारी