पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गेला महिनाभर धडाडत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. महापालिकेच्या २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ४१८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य २४ मे रोजी मतदानयंत्रात बंद होणार आहे. मतमोजणी २६ मे रोजी होणार आहे. पनवेल महापालिकेच्या पहिल्यावहिल्या सभागृहात स्वतचे स्थान निश्चित करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

पनवेल पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून सायकल, रिक्षाद्वारे प्रचार, एलईडी स्क्रीन, पत्रके, एसएमएस, समाजमाध्यमे, प्रचारसभा, प्रचारफेऱ्या या स्वरूपाच्या प्रचारामुळे पनवेलमधील वातावरणच बदलून गेले होते. आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन मते खेचून आणण्याचा प्रयत्न केला. सोमवारी ५ वाजता प्रचार संपवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार केला. पनवेलमधील मतदारसंख्या ५ लाखांच्या घरात आहे. मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या मतदारांचे प्रमाण पाहता, ५५ टक्केच मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी होणारे मतदान शांततेत पार पडावे, म्हणून ३,२०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सहा केंद्रांवर एकाच ठिकाणाहून प्रत्यक्ष नियंत्रण ठेवता यावे, यासाठी नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. हा कक्ष महापालिकेच्या इमातीत दुसऱ्या मजल्यावर आहे.   पनवेल महापालिकेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीच्या मतदानाचा हक्क बजावण्याची संधी बुधवारी ४ लाख २५ हजार ४५३ मतदारांना मिळणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने ५७० मतदान केंद्रे उभारली आहेत. त्या परिसरातील विविध विद्यालयांमध्ये मतदान केंद्रे उभारली असून त्यांची माहिती सहा विविध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गोळा होणार आहे. मंगळवारी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्रे पोहोचवली जातील. मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच २६ मे रोजी सकाळपासून मतमोजणीचे काम सुरू होईल. त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रभागनिहाय घोषित करतील. मतदानादरम्यान भ्रष्टाचार होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यासाठी निवडणूक आयोगाने भरारी पथकाची नेमणूक केली आहे. राजकीय पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते मतदारांना आमिषे दाखवत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या निदर्शनास अद्याप अशी एकही घटना आलेली नाही.

आचारसंहिताभंगप्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल

नवी मुंबई : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान आचारसंहिताभंगप्रकरणी महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी चार जणांवर कारवाई केली. पक्षाचे झेंडे विनापरवाना लावणे, उड्डाणपुलावर बेकायदा फलकबाजी, तीन व चार चाकी वाहनांच्या साहाय्याने प्रचारपरवाना न घेता जाहिरातबाजी करणे तसेच महापलिकडे उमेदवाराने नोंदवलेल्या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांवर जाहिराती लावून प्रचार करणे असे या गुन्ह्य़ांचे स्वरूप आहे. बेकायदा झेंडे लावल्याप्रकरणी प्रभाग १३ मध्ये बहुजन समाज पार्टीवर आचारसंहिताभंगाची कारवाई करण्यात आली. उड्डाणपुलावर फलक लावल्याबद्दल शिवसेनेच्या बबन पाटील यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली. त्याप्रमाणे प्रभाग १४ येथील लतीफ शेख, मुकुंद शालिख म्हात्रे, निर्मला म्हात्रे, सारिका भगत या उमेदवारांनी रिक्षांना विनापरवाना फलक लावल्याने त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या पथकाने कारवाई केली. या तक्रारी सामान्य नागरिकांनी केल्या आहेत. प्रभाग १६ मध्ये वाहनांवर विनापरवाना झेंडे व फलक लावून प्रचार करण्याऱ्या चार चाकी वाहनाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पनवेल निवडणुकीनंतरच बावखळेश्वरवर कारवाई

नवी मुंबई : पनवेल महापालिका निवडणूक आटोपल्यानंतरच खैरणे एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिर ट्रस्टच्या तीन मंदिरांवर एमआयडीसी कारवाई करणार असल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३३ एकर जमीन एमआयडीसीने ताब्यात घेतली असून तेथील तीन बेकायदा मंदिरे पाडली जाणार आहेत.

नाईक यांचा सर्वाधिक वावर असलेले बेलापूर येथील ग्लास हाऊस आणि खैरणे एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिर या दोन्ही वास्तूंच्या जागा हडप केलेल्या असून त्या स्थानिक प्राधिकरणांनी परत घ्याव्यात यासाठी वाशी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या दोन्ही जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश सिडको आणि एमआयडीसीला दिले होते. बेलापूर येथील ग्लास हाऊसची तीन हजार मीटर जमीन नाईक यांचा भाचा संतोष तांडेल याने स्वत:हून रिकामी केली.  खैरणे एमआयडीसी येथील बावखळेश्वर मंदिर ट्रस्टची जमीन ताब्यात घेण्यावरून तांडेल यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली होती. ती फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने ही जमीन एमआयडीसीने ताब्यात घ्यावी, असे आदेश दिले. त्यानुसार एमआयडीसीने ही ३३ एकर जमीन सील केली.

तीन मंदिरे व एका कार्यालयावर कारवाई करण्याची तयारी करण्यात आली आहे, मात्र असलेल्या पनवेल पालिकेची २३ मे रोजी असलेली निवडणूक आणि २६ मे रोजीची मतमोजणी आटोपल्यानंतर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.