सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर राडारोडा; महापालिकेकडून स्मरणपत्र

प्रकल्पग्रस्तांनी अतिक्रमण केलेले भूखंड मोकळे करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या सिडकोला आपल्या मालकीच्या मोकळ्या भूखंडांचे संरक्षण करण्यात मात्र अपयश आले आहे. सिडकोच्या मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमण व डेब्रिजबद्दलची माहिती नवी मुंबई पालिकेने चार वेळा दिल्यानंतरही सिडकोने कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे ह्य़ा भूखंडावर अतिक्रमण किंवा बेकायदा बांधकामे झाल्यानंतर ती हटविण्याची जबाबदारी पालिकेला पार पाडावी लागत आहे.

नवी मुंबईतील सर्व जमिनीची मूळ मालक सिडको आहे. सिडकोने पालिकेसह सर्वाना भाडेपट्टय़ाने भूखंड दिले आहेत. सामाजिक सुविधांसाठी देण्यात आलेल्या भूखंडावर झालेले अतिक्रमण व बेकायेदा बांधकामे हटविण्यास पालिकेने प्राधान्य दिले आहे. सिडकोने नवी मुंबई पालिका क्षेत्र जवळजवळ पालिकेला हस्तांतरित केले आहे, मात्र विक्रीयोग्य भूखंडांवरील ताबा कायम ठेवला आहे. यातील १०३ भूखंडांवर अतिक्रमण किंवा डेब्रिज पडले असून या भूखंडांची सिडकोने लवकर विल्हेवाट लावावी असे पालिकेने चार वेळा सिडको प्रशासनाला कळविले आहे. यात १२ भूखंड अतिशय मोक्याच्या जागी आहेत. पालिकेला या भूखंडावर होणारे अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी वारंवार पार पाडावी लागत आहे. सिडकोने मध्यंतरी स्वत:च्या मालकीच्या भूखंडांना कुंपण व भिंत घालण्याचे कंत्राट दिले होते. त्यानुसार काही भूखंडांना तारेचे कुंपण घालण्यात आले आहे मात्र हे कुंपण तोडूनही त्यावर अतिक्रमण केले जात आहे. सिडकोने गावाजवळील मोकळ्या जमिनींचे संरक्षण न केल्याने त्यावर २० हजारापेक्षा जास्त बेकायदा बांधकामे झालेली आहेत. सिडकोकडे विक्रीसाठी आता जमीन कमी राहिल्याने हडप करण्यात आलेले भूखंड मोकळे करून घेण्यावर भर दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे अधिकार पालिकेला दिले असल्याने सिडको किंवा एमआयडीसी जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे काम पालिकेला पार पाडावे लागत आहे. त्यामुळे अनेक वेळा अतिक्रमण हटवून त्या भूखंडांचे सरंक्षण न करणाऱ्या सिडकोला पालिकेने अंतिम स्मरणपत्र दिले आहे.

 

अतिक्रमण झालेले भूखंड

’ कोपरी तलावासमोर, सेक्टर २६ कोपरी गाव

’ अपोलो रुग्णालयासमोर, सेक्टर २७ बेलापूर

’ तेरणा शाळेसमोर, सेक्टर १२ नेरुळ

’ जुईनगर स्मशानभूमीसमोर, जुईनगर

’ रघुलीला मॉलसमोर, सेक्टर ३० अ वाशी

’ केरला भवनसमोर, वाशी गाव

’ गावस्कर मैदान, सेक्टर ८ अ बेलापूर

’ कोकण भवन मुख्यालयासमोरील पार्किंग जागा, सेक्टर ११ बेलापूर

’ सी वूड एल एन्ड टी च्या बाजूला, सेक्टर ३० सीवूड नेरुळ

’ केसर सॉलिटिअरशेजारी, सेक्टर१९ सानपाडा

’ तांडेल मैदान, सेक्टर २६ करावे

’ सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी सेक्टर ३० अ