ऐरोली आणि रबाळे रेल्वे स्थानकांतून गाडी पकडणाऱ्या प्रवाशांना गर्दीबरोबरच आता बंद असलेल्या पंख्यांशी सामना करावा लागत आहे. गेल्या महिन्याभरापासून ऐरोली व रबाळे रेल्वे स्थानकांतील सर्वच फलाटांवरील पंखे बंद असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ऐरोली स्थानकात फलाटावरील पंखे बंद अवस्थेत असून काही ठिकाणी कबुतरांनी वायर कुरतडल्याचे दिसत आहे. रबाळे रेल्वे स्थानकात एक आणि दोन क्रमांकाच्या फलाटांवर अवघे चार पंखे सुरू आहेत. चोरटय़ांनी वायर चोरल्यामुळे काही पंखे आणि दिवे बंद पडले आहेत. ऐराली स्थानकात गेल्या महिन्यात एलईडी दिवे बसवण्यात आले, मात्र बंद असलेल्या पंख्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. उकाडय़ामुळे त्रस्त होणाऱ्या नागरिकांनी अनेकदा याबाबत रेल्वे स्थानकांतील कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांना याची माहिती दिली; परंतु हे काम सिडकोचे असल्याचे सांगत त्यांनी जबाबदारी झटकली. नवी मुंबईतील रेल्वे स्थानके सिडकोने उभारली आहेत. मात्र सिडकोकडून रेल्वे प्रशासनकडे या स्थानकांचे हस्तांतरण करणे बाकी असल्याने प्रवाशांच्या सुविधांवर विपरीत परिणाम होत आहे.

खासदार राजन विचारे यांनी तीन महिन्यांपूर्वी नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांचा आढावा घेतला होता. या दौऱ्यात महिला प्रवाशांनी पंखे आणि दिवे बंद असल्याची तसेच सुरक्षारक्षक नसल्याची व्यथा मांडली होती. त्यानंतरही या परिस्थितीत फरक पडलेला नाही. येथे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पंख्याची व पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध नाही.
प्रतिभा जाधव, प्रवासी