नवी मुंबई शहराच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झालेल्या लढय़ाने, देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत १६ व १७ जानेवारी १९८४ रोजी दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वात ३२ वर्षांपूर्वी लढल्या गेलेल्या उरणच्या शौर्यशाली व गौरवशाली शेतकरी आंदोलनाचा शनिवारी हौतात्म्य दिन साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने १६ जानेवारी रोजी जासई येथील हुतात्मा स्मारकात आंदोलनातील पाच हुतात्म्यांना मानवंदना देऊन आदरांजली वाहन्यात येणार आहे. नेहमी प्रमाणे दुपारी ठीक १२ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नवी मुंबईतील शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी या आदरांजली कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वात सिडको व महाराष्ट्र शासनाच्या भूसंपादना विरोधात १६ व १७ जानेवारी १९८४ ला उरणच्या दास्तान फाटा व त्यावेळीच्या नवघर फाटा येथली शेतकरी लढा झाला. या लढय़ात १६ जानेवारी रोजी दास्तान फाटा येथे झालेल्या लढय़ात पोलिसांच्या गोळीबारात रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतूम) व नामदेव शंकर घरत(चिर्ले) या दोन शेतकऱ्यांनी हौतात्म्य पत्करले होते. तर आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी १७ जानेवारीला नवघर फाटा येथे झालेल्या गोळीबारात कमलाकर कृष्णा तांडेल यांच्यासह महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील या पागोटे गावातील पिता पुत्रांनी हौतात्म्य पत्करले. तर या आंदोलनात हजारो शेतकऱ्यांना कारावास झाला, लाठीमार सहन करावा लागला. त्यामुळेच या आंदोलनातून देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित जमिनीच्या बदल्यात विकसित जमीन देण्याचा कायदा झाला आहे.
हा कायदा सध्या देश पातळीवर झाला असून तीच या आंदोलनाची देण आहे. या गौरवशाली आंदोलनाचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्यासह पाच हुतात्म्याचे जासई येथे स्मारक असून नवी मुंबईतील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना न्याय देणाऱ्या या लढय़ाचे स्मरण करण्यासाठी जासई व पागोटे येथे शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी जमा होणार आहेत.
यावेळी एनसीसीच्या कॅडेटच्या वतीने मानवंदना देण्यात येते तर दोन्ही स्मारकांसह हुतात्म्यांच्या गावातील पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली जाते.