चार दिवसांपूर्वी शाळकरी मुलाचा मृत्यू; खड्डा बुजविण्याची नागरिकांची मागणी
नवी मुंबईतील पटनी कंपनीसमोरील एमआयडीसीच्या मैदानावरील मोठा खड्डा बुजविण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. या डबक्यात चार दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला होता.
मैदानात खेळताना अनेक मुले या खड्डय़ातील साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उतरतात. प्रसंगी येथे अपघात होऊन काहींना जीव गमावण्याची वेळ येते. त्यामुळे भविष्यात आणखी बळी जाण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात एका अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला याच खड्डय़ात जीव गमवावा लागला होता. गणपती पाडा, विटावा, कळवा, दिघा आणि ऐरोली येथील मुले येथे खेळण्यासाठी येतात.
काही मुले पोहण्यासाठी खड्डय़ात उतरतात. खड्डय़ात पावसाळ्यात गाळ तसाच साचत असल्याने एखादा विद्यार्थी पोहण्यासाठी गेल्यास अपघातात होऊन जीव गमवावा लागतो.
यासंदर्भात एमआयडीसी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष न दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात एमआयडीसी कार्यकारी अंभियता कलकुट्टी यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

पाण्याचा टँकरमाफियांकडून वापर
खड्डय़ातील पाण्याचा वापर टँकरमाफिया करतात. हे टँकर एका राजकीय नेत्याचे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खड्डय़ांभोवती कुंपण अथवा सावध करणाऱ्या पाटय़ा लावल्या जात नाहीत. टॅँकर भरण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाण्याचा खड्डा बुझवण्यासाठी वा त्याभोवती कुंपण घालण्यासाठी पत्र देण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त प्रशांत खरे यांनी या वेळी सांगितले.

पावसाळ्यात जास्त अपघात
खड्डय़ात पावसाळ्यात गाळ साचत असल्याने विद्यार्थी पोहण्यासाठी गेल्यास अपघातात होऊन जीव गमवावा लागतो. त्यामुळे खड्डा शक्य तितक्या लवकर बुजविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात एमआयडीसी अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे.