निलगिरी गार्डन, नेरुळ, सेक्टर १९-अ

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, तर जवळपास सर्वच संकुलांत साजरे केले जातात, मात्र नेरुळमधील निलगिरी गार्डन इथे पोंगलपासून अय्यप्पा पूजेपर्यंत सर्व उत्सव उत्साहात साजरे केले जातात. त्याबद्दल संकुलाला पोलीस आयुक्तालयाचा पुरस्कारही मिळाला आहे.

निलगिरी गार्डनमध्ये एकही महिना असा जात नाही, की ज्या महिन्यात कोणताच सण किंवा उत्सव रहिवाशांनी एकत्रित येऊन साजरा केला नाही. देशाच्या विविध प्रांतातून आलेले लोक येथे एकोप्याने राहतात आणि प्रत्येक प्रांताच्या उत्सवात सारेच रंगून जातात.

जिथे हे संकुल वसलेले आहे, तो परिसर वाहनांच्या वर्दळीने गजबजलेला आहे. पण संकुलात प्रवेश केल्यानंतर या कोलाहलाचा विसर पडतो. संकुलाच्या परिसरात नारळ, अशोकाची झाडे मोठय़ा प्रमाणात लावण्यात आली आहेत. उंचच उंच वाढलेल्या या वृक्षांमुळे येथील वातावरण कोणत्याही ऋतूत प्रसन्न असते. नेहमीच सावली पसरलेली दिसते. संकुल २० वर्षे जुने आहे. मात्र नियमित देखभाल आणि उत्तम नियोजनाकडे विशेष लक्ष दिल्याचे स्पष्ट जाणवते. आवारात कायम स्वच्छता ठेवली जाते. संकुलात एकूण ५४६ सदनिका आहेत. यामध्ये १० बंगले आणि १७ दुकाने आहेत. आवारात गणपती आणि शंकराचे मंदिर आहे.

या संकुलात पूर्वीपासूनच महाशिवरात्र मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात येते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईद, ख्रिसमस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, दत्त जयंती असे सर्वच सण-उत्सव सोसायटीमधील सर्वधर्मीय एकत्रित येऊन साजरे करतात. केरळी समाजाच्या अय्यप्पा या देवाचा उत्सवही उत्साहात साजरा केला जातो. या तीन दिवसांच्या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. लोहडी, पोंगल हे सण उत्तर भारतातील संस्कृतीची झलक महाराष्ट्रात दाखवतात. येथे नेहमीच असणारे उत्सवी वातावरण पाहून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने या संकुलाला उत्तम सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवले आहे. संकुलातील विविध उत्सवांच्या आयोजनात महिलांचा पुढाकार असतो.

संकुलाच्या आवारात कमी जागा असूनही वाहनांच्या पार्किंगचे नियोजन उत्तम करण्यात आले आहे. नियमानुसार प्रत्येक घराला एक चारचाकी आणि एक दुचाकी वाहन पार्क करण्याची मुभा आहे. वाहनांची संख्या अधिक आणि जागा कमी असूनही योग्य नियोजनामुळे कुठेही अडचण जाणवत नाही. उत्साही रहिवाशांमुळे संकुल अत्यंत सुनियोजित राहिले आहे.

आवारातच सर्व सोयी

या सोसायटीच्या आवारात सध्या भाजीपाला, इतर वस्तूंच्या विक्रीची दुकाने आहेत. परंतु अधिक सुविधा देण्यासाठी आवारातच शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरू करण्यात येणार आहे. येथील १७ दुकाने सध्या बंद आहेत. ती सुरू करण्यात येणार आहेत. दवाखानाही सुरू होणार आहे. त्यामुळे संकुलातील रहिवाशांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहेत.

सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त

संकुलात सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यासोबतच कोणत्याही अनुचित घटना किंवा गुन्हे घडू नयेत म्हणून अनोळखी किंवा नवख्या व्यक्तींना संकुलाच्या प्रवेशद्वारातून आत सोडताना, त्याच्या अंगठय़ाचे ठसे घेतले जातात आणि संगणकाच्या साहाय्याने छायाचित्रही टिपले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीला ओळखपत्र देऊनच संकुलात प्रवेश दिला जातो.