सुशोभीकरणासह विविध कामांमध्ये अडथळे

६ ऑक्टोबरला होणाऱ्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी शहरात सुशोभीकरणासह विविध कामे सुरू असतानाच मंगळवारपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाचा या स्पर्धेच्या तयारीला चांगलाच फटका बसला आहे.

या स्पर्धेसाठी पालिकेने मुंबईहून येताना नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी येथील शीव पनवेल महामार्गाच्या लगत साफसफाई आणि सुशोभीकरणाची कामे होती घेतली होती. ती कामे अद्याप पूर्ण झाली नसून मुख्य सामने होणाऱ्या डी.वाय पाटील मैदानापासून जवळच असलेल्या यशवंतराव चव्हाण मैदानाच्या बाहेरील भागाचे कामदेखील अद्याप पूर्ण झालेले नाही. दोन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या सराव मैदानांना तळ्याचे स्वरुप आले आहे. तर मैदानांवरील प्रकाश व्यवस्था करण्यातदेखील अनेक अडचणी येत आहे. अनेक ठिकाणी हायमास्टसाठी खोदलेल्या खड्डयांमध्ये पाणी भरले मैदानांच्या सभोवतालचा परिसर जलमय झाल्याने चिखल निर्माण झाला आहे.

दुसरीकडे नवी मुंबईच्या पामबीच मार्गावरील रस्त्याचा पृष्ठभाग उखडल्याने जर्मन तंत्रज्ञानाच्या मायक्रो सरफेसिंगच्या कामातदेखील अडचणी निर्माण झाल्याने   मंगळवार दुपारपासून हे काम बंद आहे.

शहरातील फिफा स्पर्धेच्या दृष्टीने कामे वेगाने सुरू आहेत. परंतु पावसाच्या अडथळ्याचा कामावर परिणाम झाला असून ही कामे पूर्णत्वास थोडा विलंब लागणार आहे. मात्र फिफा स्पर्धेपूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.

अंकुश चव्हाण,अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका.