पाचवी इयत्तेतील तनुश्री सोनावणेचे कौतुक

पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी भारतभ्रमण करणारे सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या नवी मुंबई भेटीदरम्यान पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या तनुश्री सोनावणे या विद्यार्थिनीने केलेल्या २० मिनिटांच्या भाषणात नदी अभियानाचे महत्त्व पटवून दिले. रविवारी गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या देशभर होणाऱ्या ‘रॅली फॉर रिव्हर्स’ अभियानांतर्गत हा कार्यक्रम झाला. नवी मुंबई पालिकेच्या वतीने सद्गुरू जग्गी यांचा गौरव करण्यात आला. पालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील पाचवी इयत्तेतील तनुश्री सोनावणे या दहा वर्षीय विद्यार्थिनीने सादर केलेल्या भाषणाला ‘ईशा फाऊंडेशन’च्या फेसबुकवर २१ हजार प्रेक्षकांनी लाइक्स मिळाले. या भाषणाला ‘मराठी मिर्ची’ अशी टॅगलाइन दिली.

नदी प्रदूषणामुळे नद्या केवळ पावसाळ्यातच वाहत आहेत, असे सांगतानाच २९ ऑगस्ट मुंबई जलमय झाल्याचा दाखला तिने दिला. तनुश्रीने भाषण न दाखवता विविध दाखले दिले. या तिच्या कौशल्यावर बेहद्द खूश होऊन वासुदेव जग्गी यांनी तिला कडेवर उचलून घेतले.

याप्रसंगी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे, आयुक्त डॉ. रामास्वामी आणि पालिकेचे स्वच्छतादूत शंकर महादेवन उपस्थित होते. तनुश्री हिचे वडील किरण सोनावणे हे रंगारी म्हणून काम करतात. शाळेसमोरच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या सोनावणे कुटुंबाची घरची परस्थिती बेताची आहे.