जून ते जुलै या पावसाळ्यातील सुरुवातीच्या दोन महिन्यांसाठी खोल समुद्रातील मासेमारीवर राज्य व केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे. त्यामुळे मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी मासळीचे दरही वाढलेले आहेत; परंतु सध्या बिगरयांत्रिकी मासेमारी बोटींना परवानगी असल्याने या मासेमारीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उरणमधील मासळी बाजारातील मासळीच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे मंगळवारी उरणच्या बाजारात मोठय़ा संख्येने मासळीच्या खरेदी-विक्रीसाठी गजबजाट सुरू झाला आहे.

मासेमारीसाठी उरणमधील करंजा आणि मोरा ही दोन बंदरे प्रसिद्ध आहेत. या दोन्ही बंदरांतून मोठय़ा संख्येने यांत्रिक मासेमारी बोटीतून मासेमारी केली जाते. ही सर्व मासळी उरणच्या दोन्ही बाजारांसह संपूर्ण तालुक्यात त्याची विक्री केली जाते; पंरतु मासेमारीवर बंदी असल्याने मासळीचे प्रमाण घटले होते. त्यामुळे मासळी बाजार ओस पडले होते. मासळी बाजारात मासळीची खरेदी-विक्री थांबल्याने अनेकांवर याचा परिणाम झाला होता. तसाच तो नेहमीच्या खवय्यांवरही झाला आहे. असे असले तरी बाजारात स्थानिक मासळी येऊ लागली होती. या मासळीची संख्या कमी असल्याने ती महाग होती. त्यामुळे खवय्यांचा मोर्चा चिकनकडे वळला होता. तर मासेमारी बंदीच्या कालावधीत किनाऱ्यावर मासेमारीला परवानगी असल्याने थोडीफार मासळी बाजारात येत होती. सध्या या मासेमारीचे प्रमाण वाढल्याने मासळीच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी कोळंबी, पाला तसेच इतर प्रकारच्या मासळीची आवक मोठय़ा प्रमाणात झालेली होती. बोटीच्या मालकिणी व मासळीची किरकोळ विक्री करणाऱ्या महिला यांनी बाजारात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा मासळी मार्केट बहरून गेले होते. यानंतर मासळीची आवक हळूहळू वाढण्याची शक्यता असून त्यामुळे मासळीचे दरही कमी होतील असा विश्वास रुक्मा कोळी यांनी व्यक्त केला आहे.

बोंबिलांची प्रतीक्षा

पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात मिळणार व स्वस्त असा मासा म्हणजे बोंबील. हा मासा पावसाच्या विजेच्या गडगडाटाबरोबर येत असल्याने त्याला गडगडे असेही म्हटले जाते. या मासळीची खवय्यांना प्रतीक्षा आहे.