दक्षिण नवी मुंबईत आज पाच गृहप्रकल्पांचा मुहूर्त

दिवाळीनंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटाबंदीत कंबरडे मोडलेल्या विकासकांना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणाऱ्या हिंदू नव वर्षांत आशेचे किरण दिसू लागले आहेत. गृहकर्ज देणाऱ्या वित्त संस्थांनी कमी केलेले व्याजाचे दर आणि परवडणाऱ्या घरांना आलेली मागणी यामुळे येत्या सहा महिन्यांत मंदीत असलेला बांधकाम व्यवसाय पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महामुंबईच्या दक्षिण नवी मुंबई भागात अर्थात नैना क्षेत्रात पाच नवीन गृहप्रकल्प गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होत आहेत. या ठिकाणी विक्रीविना पडून असलेल्या घरांच्या किमतीदेखील विकासकांनी पंधरा ते वीस टक्के खाली आणल्या असून नवीन छोटी घरे तीन हजार रुपये प्रति चौरस फुटांपर्यंत विकली जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबईत घराचे स्वप्न पूर्ण करू न शकणाऱ्या ग्राहकांना पश्चिम रेल्वे मार्गावर वसई-विरार तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल हा चांगला पर्याय निर्माण झाला आहे. मुंबईत नोकरी-धंद्यानिमित्ताने दररोज ये-जा करणाऱ्या चाकरमन्याला वसई-विरार, नेरळ-कर्जतपेक्षा जास्त पंसती पनवेलला आहे. त्यात पनवेल रेल्वे स्थानक हे टर्मिनलमध्ये रूपांतरित होणार असल्याने घर घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र ही घरे परवडणारी असावीत अशी अपेक्षा  आहे. नैना क्षेत्रात जमीन घेऊन ठेवणाऱ्या विकासकांनी स्वस्त दरात घरांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.  पामबीच, नेरुळ, वाशी, सीबीडी या भागात कोटय़वधी किमतीची घरे असून त्यांना सध्या मागणी नाही. घरांची किंमत ७० लाखांच्या वर गेल्यावर ग्राहक पाठ फिरवत असल्याचा अनुभव विकासकांनी व्यक्त केला आहे. ३० ते ५० लाख रुपये किमतीची घरे ग्राहक शोधात असल्याने मंदीतही तळोजा, करंजाडे, उलवा या भागात विकासक गृहप्रकल्प मंगळवारी सुरू करीत आहेत.

निश्चलीकरणामुळे घरांच्या किमती घसरल्या आहेत. विकासक छोटय़ा घरांच्या निर्मितीकडे वळला आहे, असे वाशी येथील विकासक अश्विन रुपारेल म्हणाल्या.