‘आयसिस’च्या प्रशिक्षणासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गानजीकच्या कर्नाळा अभयारण्यात रेकी करण्यात आली. या घटनेनंतर वनविभागाने चिरनेर आणि रानसईचे जंगलातील पर्यटकांच्या हालचालींवरही नजर ठेवण्यासाठी उरणमधील वनविभागाने गस्तीत वाढ केली आहे. या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून वॉच टॉवरचीही मागणी करण्यात आलेली आहे.

काही व्यक्तींनी कर्नाळा अभयारण्यांची रेकी करून दहशतवादी तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी जागेची निवड करण्यासाठी रेकी केलेली होती. त्यामुळे दहशतवाद्यांची  रायगड जिल्ह्य़ातील जगंलातील हालचालींवर लक्ष असल्याचे उघड झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या या जंगलाला लागूनच उरण परिसरातील चिरनेर व रानसईचे जंगल आहे. या जंगलात गुहा असल्यामुळे दहशतवाद्यांच्या नजरेत जर अशा जागा पडल्यास या परिसरालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे उरणच्या चिरनेर व रानसई येथील जंगलात नेहमीप्रमाणे जंगलातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाकडून नेमण्यात आलेल्या वनसंरक्षक शिपायांच्या गस्तेत वाढ करण्यात आलेली आहे. या जंगलात अनेक ठिकाणी दाट वनराई असून अशा ठिकाणी ही केंद्रे सुरू होण्याचा धोका आहे. या जंगल  परिसरात रानसई येथे आदिवासी वाडय़ा आहेत.

मात्र सध्याच्या मोसमात अनेक वाडय़ातील आदिवासी हे शहराच्या ठिकाणी वीटभट्टय़ांवर तसेच उद्योगांवर जगण्यासाठी (कामासाठी) जातात. त्यामुळे अनेक वाडय़ावर वयस्क, गरोदर महिला तसेच लहान मुले असतात. या संदर्भात उरणचे वनपाल चंद्रकांत मराठे यांच्याशी संपर्क साधला असता कर्नाळा येथील घटना उघड झाल्यानंतर उरण वनविभागाकडून तातडीने जंगलाच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यात येत आहे.

यामध्ये गस्ती वाढविण्यात आल्या असून वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे येथील जंगल परिसरात वॉच टॉवर उभारण्याचीही मागणी करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.