महामंडळावर वर्णी लावण्याच्या आमिषाने १ कोटी ७० लाखांचा गंडा

माजी आमदार विजय कांबळे यांचा मुलगा जितेंद्र याची केंद्रातील महामंडळ देतो, असे सांगून एक कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या कामोठे येथील उदयसिंग महाराज याला कामोठे पोलिसांनी सासवड पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. उदयसिंग प्रतापराव चव्हाण ऊर्फ महाराज असे त्याचे नाव आहे. जितेंद्र कांबळे यांनी ५० लाख रुपये बँकेतून आणि उर्वरित रोख रक्कम उदयसिंग याला दिली होती, मात्र महामंडळ न मिळाल्याने वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम परत न मिळाल्याने कांबळे यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. याप्रकरणी उदयसिंगला १ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

माजी आमदार कांबळे यांचा मुलगा जितेंद्र याची वर्णी केंद्र किंवा राज्य सरकारच्या महामंडळावर लावतो, असे आश्वासन उदयसिंग महाराज याने दिले होते. आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या संपर्कात असल्याचे, तो भासवत असे. या आमिषाला बळी पडून जितेंद्र याने १ कोटी ७० लाख रुपये त्याला दिल्याचे, त्याने केलेल्या तक्रारीत नमूद आहे. उदयसिंग महाराज कामोठे वसाहतीमधील रहिवासी आहे. जितेंद्र हा नृत्यदिग्दर्शक असून, दोन वर्षांपूर्वी एका मित्राने त्याची ओळख उदयसिंगशी करून दिली होती. त्यानंतर त्यांच्या गाठीभेटी वाढल्या.

उदयसिंगच्या भूलथापांना विजय कांबळे देखील बळी पडले. त्यांनी मुलाची वर्णी महामंडळावर लागावी म्हणून पैसे देण्याची तयारी दाखवली. कांबळे यांनी दिलेली रक्कम त्यांच्या एका न्यासाच्या बँक खात्यातून वळती झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. उदयसिंगनेही त्याला मिळालेली रक्कम न्यासाच्या बँक खात्यात जमा केली. पैसे देऊनही महामंडळ मिळत नसल्याचे निदर्शनास आल्यावर कांबळे कुटुंबीयांनी महाराजांच्या मागे तगादा लावला. सहा महिन्यांपूर्वी कांबळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. उदयसिंगने अटकपूर्व जामीन मिळविला. महाराजच्या वतीने न्यायालयात करण्यात आलेल्या युक्तिवादात कांबळे यांनी महाराजांच्या न्यासाला सामाजिक कार्यासाठी रक्कम दान केल्याचे म्हटले होते. त्यानंतर मागील महिन्यात सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उदयसिंगविरोधात खंडणी व पळवून नेण्याचा गुन्हा दाखल झाला. त्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. सासवड पोलिसांचा ताब संपताच कामोठे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

संपत्तीची चौकशी सुरू

उदयसिंगवर वाशी पोलीस ठाण्यात धनादेश न वटल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या न्यासात एकूण किती रक्कम जमा आहे. ती कोणी जमा केली व न्यासाच्या खात्यातून नेमके कोणते व्यवहार होताता याचा तपास कामोठे पोलीस करत आहेत. अद्याप उदयसिंगकडे कांबळे यांची रक्कम मिळाली नसली, तरी पोलीस महाराजने कमविलेल्या संपत्तीची चौकशी करत आहेत.