नवी मुंबई पालिका व वाहतूक विभाग यांच्या पुढाकाराने एका बडय़ा वर्तमानपत्राच्या आर्थिक सहकार्यावर गेली अनेक दिवस सुरू असलेला ‘आनंदी रस्ता’ कार्यक्रमाला माजी मंत्री गणेश नाईक यांनी विरोध दर्शविला आहे. सर्वाधिक अपघातप्रवण असलेल्या पाम बीच मार्गावर मधोमध एक किलोमीटरचा रस्ता अडवून रविवारी करण्यात येणाऱ्या या इव्हेंटमुळे एखादा मोठा अपघात घडण्याची भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे सायकलचे महत्त्व पटवून देण्यासाठी पाम बीच मार्गावर तीन वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. परदेशात अशा प्रकारे आठवडय़ातून एकदिवसीय उपक्रम राबविले जातात. मुंबई पालिकेनेही अशा उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला देशातील एका बडय़ा वर्तमानपत्र साखळीने आर्थिक सहकार्य देण्यास सुरुवात केली असून रविवारी सकाळी दोन तास पाम बीच मार्गावरील वजराणी स्पोर्ट्स ते चाणक्यदरम्यानचा एक किलोमीटरचा रस्ता या आनंदी रस्ता उपक्रमातील क्रीडा, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अडवला जात आहे. या कार्यक्रमांना पालिका व पोलिसांचे सहकार्य असल्याने त्यांची यंत्रणा त्या ठिकाणी वापरली जात आहे. कार्यक्रम स्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर बॅरिकेड्स लावून वाहतूक वळविली जात आहे. त्यामुळे सुसाट आलेल्या वाहनचालकांना हे अडथळे पार करून जावे लागत आहे. हा एक किलोमीटर अंतराचा भाग आहे. या कार्यक्रमात हजारो आबालवृद्ध सहभागी होत असल्याचे आढळून आले आहे. पाम बीचसारख्या वर्दळीच्या मार्गावर असे कार्यक्रम घेणे योग्य नसल्याचे मत नाईक यांनी व्यक्त केले आहे. नवी मुंबईत अनेक सेवा रस्ते चांगले व विस्तीर्ण आहेत. त्या ठिकाणी असे कार्यक्रम करण्यास हरकत नाही, अशी सूचना त्यांनी केली.