नवी मुंबईत ६५ टक्के वर्गीकरण; झोपडपट्टय़ांचाही अडथळा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात शहरी भागांत कचऱ्याचे वर्गीकरण होत असले, तरी झोपडपट्टी आणि गावठाण भागात आद्याप या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. त्यामुळे कचरा वर्गीकरणाला १०० टक्के यश येण्यात अडथळा निर्माण होत आहे. शहरात सध्या ६५% कचऱ्याचे वर्गीकरण होत आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात २०१६पासून कचरा वर्गीकरणाला सुरुवात झाली. या दीड वर्षांत कचरा वर्गीकरणासंदर्भात पालिकेने मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली. त्यामुळे कचरा वर्गीकरणात पालिकेला काही प्रमाणात यश मिळत आहे. शहरी भागांत सर्वत्र कचऱ्याचे वर्गीकरण होत असले तरी झोपडपट्टी आणि गावठाण भागात आद्याप या योजनेला थंड प्रतिसाद मिळत आहे.

कचरा वर्गीकरण हा स्वच्छता अभियानाचा कणा समजला जातो. त्या दृष्टीने नवी मुंबई पालिकेने सुरुवातीपासूनच ठोस पावले उचचली. २०१६ पासून ही ओला व सुका कचरा व्यवस्थापन व शून्य कचरा या संकल्पना पालिका क्षेत्रात राबविण्यात आल्या. शहरात दररोज ७०० टन कचरा साचतो. यापैकी ३५० टन ओला आणि ३५० टन सुका कचरा असतो. या कचऱ्यावर तुर्भे येथील कचरा भूमीवर शास्त्रशुद्ध प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जात आहे. या वर्गीकरणातून दररोज ३० टन ते ४० टन खत निर्मिती होते. महिन्याला सुमारे २१ हजार टन खत तयार होते. आजवर या प्रकल्पातून जवळपास ४ लाख ४१ हजार टन कचऱ्यातून २५ हजार २००टन खतनिर्मिती करण्यात आली आहे. राज्यात इतर ठिकाणी पालिका पातळीवर कचऱ्याचे वर्गीकरण आद्याप व्यवस्थित सुरू झालेले नाही.

मुंबईतील देवनार कचराभूमीवर कचऱ्याचे मोठे ढीग सचले आहेत. तसेच पिंपरी चिंचवडमध्येदेखील ही योजना राबविली जाते मात्र तिथेही म्हणावे तितके यश मिळालेले नाही. कचरा वर्गीकरणात राज्यात नवी मुंबई महापालिका आघाडीवर आहे, मात्र शहरातील काही मोजक्या विभागांमुळे अद्याप १०० टक्के लक्ष्य गाठण्यात अपयश येत आहे. झोपडपट्टी आणि गावठाण विभागात कचरा वर्गीकरणाविषयी जनजागृती करून आणि कार्यशाळा घेऊनही अल्प प्रतिसाद मिळत आहे, अशी खंत पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

कचरा वर्गीकरणात नवी मुंबई महानगरपालिका राज्यात आघाडीवर आहे. शहरी भागात कचरा वर्गीकरण व्यवस्थित होत आहे, परंतु झोपडपट्टी व गावठाण विभाग मागे पडला आहे. या विभागात जास्तीत जास्त जनजागृती करण्यावर पालिकेचा भर आहे.

तुषार पवार, उपायुक्त, स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष, नमुंमपा

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garbage classification nmmc
First published on: 28-09-2017 at 02:46 IST