फराळ, मिठाई महाग; कमी मागणीमुळे व्यापारी चिंतेत

दिवाळी म्हणजे मिठाई आणि फराळाची रेलचेल, मात्र यंदा जीएसटीमुळे दिवाळीच्या गोडव्यात घट झाली आहे. फराळ आणि मिठाईचे दर सुमारे ४० रुपयांनी वाढल्यामुळे ग्राहक मोजून मापून ऑर्डर देत आहेत. दिवाळी तोंडावर आली असताना अद्याप मोठय़ा ऑर्डर न आल्याने व्यापारी चिंतेत आहेत.

बदलत्या जीवनशैलीत घरी फराळ तयार करण्याचे प्रमाण घटले असून तयार फराळ खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा फराळासाठीची ऑर्डर दिवाळीच्या किमान आठवडाभर तरी आधी नोंदवली जाते. मात्र यंदा हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मिठाईच्या दुकानांत मात्र शुकशुकाट आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ ७० टक्के व्यवसाय होण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत. यंदा अद्याप कोणीही फराळाची ऑर्डर दिली नसल्याचे मनमोहन मिठाई दुकानातील व्यापाऱ्यांनी सांगितले. मागील दिवाळीत घरगुती स्वरूपाच्या २ लाख ते ३ लाख रुपयांच्या मिठाईच्या आणि फराळाच्या ऑर्डर्स मिळाल्या होत्या. व्यावसायिक स्वरूपाच्या म्हणजेच मोठय़ा कंपन्यांकडून येणाऱ्या ५ लाखांपर्यंतच्या ऑर्डर आल्या होत्या. यंदा अद्याप एकही मागणी आलेली नाही. त्यामुळे वस्तू आणि सेवा करामुळे आमच्या व्यापारावर मंदीचे सावट असल्याचे स्पष्ट दिसते, असेही ते म्हणाले.

वस्तू आणि सेवा करामुळे आमच्या बाजाराचे गणित पूर्णत: कोलमडले आहे. दर वर्षीच्या तुलनेत ग्राहक आणि मागणी यात घट झाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर एकही मागणी आलेली नाही. काही ग्राहकांनी मिठाईव्यतिरिक्त वेगळ्या भेटवस्तू देऊन दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जगदीश चौधरी, व्यापारी, मनमोहन मिठाई

मिठाईला यंदा फारशी मागणी नाही. मागणीनुसार आम्ही मिठाई आणि फराळाच्या तयारीला सुरुवात करतो. जीएसटीमुळे यंदा बाजार थंडावला आहे.

– बाळाराम चौधरी, व्यापारी, बिकानेर