यंदा हापूसची मोठी आवक; मात्र हंगाम लवकर संपण्याची शक्यता

वातावरणातील बदलांचा कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पादनावर कोणताही विपरीत परिणाम झाला नसून यंदा आवक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोकणातून सध्या सरासरी ३० ते ३५ हजार पेटय़ा हापूस आंबे घाऊक बाजारात येतात. ही आवक गतवर्षी पेक्षा जास्त आहे, मात्र हा हंगाम लवकर संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आवक जेमतेम दीड महिना सुरू राहू शकेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर कर्नाटकी हापूस आंबे मोठय़ा प्रमाणात दाखल होतील.

राज्यात उत्तम पाऊस झाल्यामुळे यंदा हापूस आंब्याची चांगले उत्पादन होण्याची आशा बागायदारांना होती मात्र जानेवारी-फेब्रुवारीत पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे मोहर गळून पडण्याचे प्रमाण वाढल्याने यंदा हापूस आंब्याचे उत्पादन घटेल, अशी भीती बागायतादरांना वाटत होती, मात्र त्यानंतर झालेल्या फळधारणेत हापूस आंब्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे गुढीपाडव्यापूर्वीच बाजारात हापूस आंबा पाठविण्याची अहमहमिका वाढली. हे प्रमाण गतवर्षीपेक्षा जास्त आहे. सोमवारी कोकणातील हापूस आंब्याच्या ४३ हजार पेटय़ा (एका पेटीत जास्तीत जास्त पाच डझन आंबे असतात) आल्याची नोंद आहे. मंगळवारी व बुधवारी ही सरासरी ३५ हजार पेटय़ांची आहे. मागील हंगामापेक्षा आवक जास्त आहे. आवक अचानक वाढल्याने कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम लवकर संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केरळ, कर्नाटक हापूसची स्पर्धा

कोकणातील हापूस आंब्याला दक्षिणेतील हापूस आंब्याबरोबर मोठी स्पर्धा करावी लागणार आहे. बाजारात सध्या केरळ व तामिळनाडूमधील हापूस आंबा येत आहे. कोकणातील हापूस आंबा बागायतदारांएवढे कौशल्य आत्मसात न केलेले केरळमधील बागायतदार या आंब्याची बाजारात लवकर रवानगी करीत असल्याने तो चांगला आंबा म्हणून ओळखला जात नाही. कोकणातीलच हापूस आंब्याची रोपे नेऊन लागवड करणारे हे बागायतदार तोडणी, मार्केटिंग यांची शिकवण एपीएमसी बाजारात येऊन घेत आहेत. भविष्यात कोकणातील हापूस आंब्याला दक्षिणात्य हापूसची स्पर्धा आहे. केरळमधील हापूसचा हंगाम संपल्यानंतर एप्रिलमध्ये कर्नाटक हापूसची आवक सुरू होणार आहे.