वाशी, नेरूळ, ऐरोली परिसरातील पदपथांवर पुन्हा अतिक्रमण

वाशी, नेरुळ, ऐरोली, येथील मोक्याच्या जागांवर फेरीवाल्यांचे प्रस्त पुन्हा वाढले असून पालिकेचा अतिक्रमण विभाग या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात गायब झालेले शहरातील फेरीवाले पुन्हा पदपथांवर दिसू लागले आहेत.

वाशी सेक्टर-९, १० मधील पदपथावर बसलेल्या हजारो फेरीवाल्यांवर नवी मुंबई पालिकेचे माजी आयुक्त मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी कारवाई केली होती. त्यातील परवानाधारक फेरीवाल्यांना वाशी सेक्टर-७ मधील नाल्याजवळील मोकळ्या जागेत ‘फेरीवाला क्षेत्र’ तयार करून व्यवसायाची मुभा देण्यात आली होती. मात्र मुंढे नवी मुंबईच्या आयुक्तपदावरून पायउतार झाल्यानंतर या फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाल्यांनी पुन्हा सेक्टर ९, १० मध्ये आपले बस्तान बसविले आहे. अशीच परिस्थिती वाशी, नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर  देखील आहे. ऐरोली सेक्टर-३, ८ मधील पदपथांवरदेखील फेरीवाल्यांचा कब्जा आहे. सणासुदीच्या नावाने पदपथावरील हे फेरीवाले कायम झालेले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यास स्थानिक प्रभाग अधिकारी व अतिक्रमण विभाग अपयशी ठरले आहेत.

आयुक्तांच्या मवाळपणाचा अधिकाऱ्यांकडून फायदा 

माजी आयुक्त मुंढे यांचा चांगलाच दरारा प्रशासनावर होता. त्यामुळे अधिकारीवर्ग फेरीवाले, अतिरिक्त जागा (मार्जिनल स्पेस) हडप करणाऱ्या व्यापाऱ्यांची पाचावर धारण बसली होती. कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणाऱ्या मुंढेंमुळे फेरीवाले पदपथावरून गायब झाले होते. मात्र नवीन आयुक्त हे मवाळ असून पाहणी केल्याशिवाय कारवाई करीत नसल्यामुळे त्याचा फायदा अधिकारीवर्गाने उठविण्यास सुरुवात केली आहे. फेरीवाल्यांना कारवाईची खबर देणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवरील प्रशासनाच्या कारवाईनंतर कर्मचारी व फेरीवाले यांचे साटेलोटे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे मुंढे यांच्या बदलीनंतर सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांमुळे बेकायेदशीर बांधकामे, फेरीवाले, पदपथ भाडय़ाने देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे.