काही वर्षांपूर्वी ज्या भागात केवळ जंगल होते आणि आजही जो भाग विकासापासून वंचित आहे अशा रोडपालीत सध्या सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे अवजड वाहनांची रहदारी आणि पार्किंग. तळोजा लोखंड बाजारात ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांच्या रहदारीतून मार्गक्रमण करणे हे येथील रहिवाशांसाठी मोठे आव्हान आहे. प्रभाग सातमध्ये गेल्या वर्षांत अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, मात्र त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा अद्याप निर्माण करण्यात आलेल्या नाहीत. कासाडी नदीच्या प्रदूषणाने येथील रहिवासी त्रस्त आहेत.

तळोजा येथील लोखंड बाजार हा आशिया खंडातील लोखंडाचे सर्वात मोठे व्यापार केंद्र मानले जाते. तिथे सतत अवजड वाहनांची रहदारी सुरू असते. ही वाहने लोखंड बाजारातील रस्त्यांच्या दुतर्फा पार्क केली जातात, मात्र ते रस्तेही अपुरे पडू लागले की, ही वाहने आपला मोर्चा रोडपाली विभागात वळवतात. रोडपाली परिसरात सिकोडने ठिकठिकाणी हाइट गेट लावले आहेत, मात्र वाहनचालकांनी हे गेटही तोडून टाकले आहेत. अवजड वाहनाना बंदी असा सिडकोचा भला मोठा फलक जिथे लावण्यात आला आहे, तिथेही अवजड वाहने बिनधास्तपणे पार्क केली जातात. अवजड लोखंडी सामानाने आणि रसायनांनी भरलेले कंटेनरदेखील या भागात सर्रास पार्क  केले जातात.

कासाडी नदीतील प्रदूषणाने येथील रहिवासी पुरते हैराण झाले आहेत. या नदीत तळोजा औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जाते. त्यामुळे नदी तर प्रदूषित झाली आहेच, शिवाय तिची दरुगधीही सतत हवेत पसरलेली असते. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. नदी आणि खाडीची वेळच्या वेळी साफसफाई केली जात नाही, अशी रहिवाशांची तक्रार आहे. सतत पाठपुरावा करूनही ही समस्या सोडवण्यात आलेली नाही, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

सेक्टर २०मधील रस्ते विविध कामांसाठी खोदण्यात येतात, मात्र ते पूर्ववत केले जात नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी येथील रहिवासी वारंवार करतात, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे त्यांना खड्डय़ांतूनच मार्ग काढावा लागतो.

मूलभूत आरोग्य सुविधा अद्याप देण्यात आलेल्या नाहीत. या प्रभागातील नागरिक जवळच असलेल्या एमजीएम या निमसरकारी रुग्णालयात जातात. प्रभागात सरकारी रुग्णालय, सुलभ शौचालय या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. उद्यानात जाण्यासाठीही दोन किमी पायपीट करावी लागते. अपुऱ्या परिवहन सेवेमुळे रिक्षाचालकांची मनमानी वाढली आहे.

भाजी मंडईही नाही

कळंबोली सिडकोपासून पुढे रोडपालीपर्यंत टोलेजंग इमले उभारण्यात आले आहेत. पण त्यांत राहणाऱ्यांसाठी भाजी मंडई नाही. या प्रभागातील सेक्टर १७ आणि २० तसेच गणेश घाट या परिसरात जास्त लोकवस्ती आहे. भाजी तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी त्यांना दोन किलोमीटरवर असलेला कळंबोली भाजी बाजार किंवा डी-मार्ट गाठावे लागते. याचा फायदा घेत जवळपासचे भाजीविक्रेते चढय़ा दराने विक्री करतात. या परिसरात जवळपास गिरणी नाही.