नवी मुंबई शहरातील ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे आदी ठिकाणी अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी असूनही या रस्त्यांवर अवजड वाहतूक सर्रास सुरूच आहे. ही अवजड वाहने वाहतूक कोंडी आणि अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. परिसरातील रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. वाहतूक पोलीसही याकडे दुर्लक्ष करत आहेत.

अवजड वाहनांना ठाणे-बेलापूर मार्गावरून ये-जा करण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र ही परवानगी देताना शहरातील अंतर्गत रस्त्यांवर या वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे, परंतु वाहतूक पोलिसांचा वचक नसल्यामुळे अंतर्गत रस्त्यावर अवजड वाहने बिनधास्त ये-जा करत आहेत. ठाणे-बेलापूर मार्गावर पोलिसांच्या कचाटय़ातून सुटण्यासाठी वाहनचालक या मार्गाचा वापर करत आहेत. भरधाव आणि बेशिस्तपणे वाहने चालवतात. त्यामुळे रहिवाशांना वाहन चालवणे किंवा रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे.

वाहतूक पोलीस हा नियमभंग रोखण्यात अपयशी ठरले आहेत. अवजड वाहतूक रोखणे तर दूरच पण साधा दंडही ठोठावला जात नाही. दोन वर्षांपूर्वी ऐरोली सेक्टर ३मध्ये अंतर्गत रस्त्यावर अवजड वाहनाने दिलेल्या धडकेत एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जीव गमावावा लागला होता. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना गावठाणातील रस्त्यांवरून ये-जा करण्यास बंदी घातली होती, मात्र गस्त थंडावताच पुन्हा वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे.

शहराच्या अंतर्गत भागांत शालेय विद्यार्थी, शाळांच्या बसगाडय़ा, रुग्णवाहिका, दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहनांची वर्दळ असते. या वाहनांच्या चालकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते.

ठाणे-बेलापूर मार्गावर पादचारी पुलाचे काम सुरू असल्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरून अवजड वाहने येत असावीत. अशा अवजड वाहनांवर कारवाई करण्यात येईल.

योगेश माने, पोलीस उपनिरीक्षक, रबाळे वाहतूक शाखा

अंतर्गत रोड लहान असल्याने अशा रस्त्यावरून अवजड वाहने आल्यास वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे जिकिरीचे झाले आहे. अशा अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात यावी.

सनी धुमाळ, नागरिक