कोपरखैरणे

सातवीपर्यंत शाळा गावात होती. त्यानंतर तरुणांनी तुर्भे व घणसोलीची वाट धरली. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार गावात चांगला झाला. जुन्या मोडी भाषेत वाचन लिखाण करणारे विष्णुपंत पंगारी म्हात्रे यांच्यापासून ते गावातील पहिले पदवीधर ठरलेले अ‍ॅड. पी. सी पाटील यांचा उल्लेख गावात आवर्जून केला जातो. पाटील यांनी कायदेविषयक, शैक्षणिक तसेच प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात बरेच काम केले.

कोपरखैरणे. ठाणे बेलापूर पट्टीतील एक उच्चशिक्षित ग्रामस्थांचे गाव. घणसोली आणि जूहूगाव यांच्या मधोमध असलेल्या या गावाची सीमा ठाणे-बेलापूर मार्गापर्यंत पसरलेली आहे. त्यामुळेच नवी मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर चौथे रेल्वे स्टेशनला कोपरखैरणे नाव देण्यात आले आहे. याच स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर खाडीकिनारी हे गाव वसले आहे. पूर्व बाजूला सह्य़ाद्रीच्या रांगा आणि पश्चिम बाजूला अथांग समुद्राला लागून असलेल्या या गावात सर्वाधिक विहिरी (बावडय़ा) होत्या. त्यामुळे ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात या गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई कधी जाणवली नाही. दक्षिण बाजूस-जूहूगाव-बोनकोडे-खैरणे या गावांच्या सीमा तर उत्तर बाजूस घणसोली खाडीचे पात्र अशा भौगोलिक रचनेत सामावलेल्या या गावाने पंचक्रोशीतील पहिले वकील, डॉक्टर दिले. त्यामुळेच बेलापूर पट्टीतील २९ गावांत कोपरखैरण्याचे नाव आजही आदराने घेतले जाते.

नवी मुंबईतील सर्व गावांत लोकसंख्येने तिसऱ्या क्रमांकावर असलेले हे गाव थेट अरबी समुद्राच्या खाडीलाच लागून आहे. त्यामुळे काल-परवापर्यंत आमावस्येच्या मोठय़ा भरतीतील (उधाण) अरबी समुद्राचे पाणी थेट गावात घुसत असल्याचे अनेक ग्रामस्थ सांगतात. आता नागरीकरण मोठय़ा प्रमाणात वाढल्याने गावाच्या चारही बाजूने भराव टाकून इमारती उभ्या राहिल्या त्यामुळे भरतीच्या या पाण्याला टाकलेल्या भरावाने व वाढलेल्या खारफुटीने रोखून धरले आहे. या संदर्भात गावात एक किस्सा मोठा आवडीने सांगितला जातो.

[jwplayer dGcM0Dob]

१९४६च्या पावसाळ्यात समुद्रात मोठे वादळ आले होते. त्यामुळे अनेक छोटी-मोठी जहाजे किनाऱ्यावर लागली होती. कोपरखैरणे गावाच्या किनाऱ्यावरही अशी चार-पाच जहाजे लागली होती. या जहाजात तस्करीचा मोठा माल होता. त्यात उंची दारूच्या बाटल्या, सोन्याची बिस्किटे, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, तांबा, चांदी होती. वादळामुळे किनाऱ्याला लागलेली ही जहाजे म्हणजे ग्रामस्थांसाठी लॉटरीच होती. जहाजातील माल त्या वेळी लंपास करण्यात आला. तसे गाव शांतताप्रिय. त्यामुळे गावात कधी भांडण-तंटा झाल्याचे ऐकिवात नाही. समुद्राला लागून असलेल्या या गावात चक्क नऊ गोडय़ा पाण्याच्या विहिरी होत्या. त्यामुळे विहिरींचे गाव अशीही या गावाची एक जुनी ओळख आहे. तळ्याची विहीर, दारची विहीर, गोवंडची विहीर, नवी विहीर, लामण विहीर, वरणाची विहीर, बोंडारा विहीर (विहिरींना आगरी भाषेत बाव म्हटले जाते) अशा गावात नऊ ते दहा विहिरी असल्याचा दाखला मिळतो. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची मुबलकता पाहता कधी या गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही. त्यामुळे आजूबाजूच्या बोनकोडे, खैरणे, जूहूगावातील ग्रासस्थांनाही पाणी आणीबाणीच्या काळात या   गावातून पाणीपुरवठा केला जात होता. गावात एक विस्तीर्ण असे तलावदेखील होते. ते नंतर शहरीकरणात बुजविण्यात आले. पश्चिम बाजूस आता एक नवीन तलाव निर्माण करण्यात आले आहे. शेती आणि मासेमारी हे दोनच मुख्य व्यवसाय असणाऱ्या या गावाचा कायापालट हा १९६० नंतर झाला. एमआयडीसी क्षेत्रात काही कारखाने सुरू झाल्यानंतर या गावातील सुशिक्षित तरुणांनी नोकरी व्यवसाय पत्करला. काही तरुणांनी एमआयडीसीत छोटय़ा-मोठय़ा नोकऱ्या स्वीकारल्या. गावाच्या वेशीवर असलेल्या आत्ताच्या तीन टाकी क्षेत्राची जागा त्या वेळी लिलाववाला शेठने विकत घेतली होती. त्यामुळे या जागेत त्याने पोल्ट्री फार्म सुरू केले होते. गावाच्या बाहेर सुरू झालेला हा पहिला व्यवसाय. शंभर टक्के आगरी समाज असलेल्या या गावात पाटील, म्हात्रे, भोईर आणि वेटा या ग्रामस्थांची पन्नास एक कुटुंबे होती. त्यांचा विस्तार अलीकडे एक हजार ग्रामस्थांच्या वर झाला आहे. गावाला कोपरखैरणे हे नाव कसे पडले याचे ठोस उत्तर जरी कोणाकडे नसले तरी शेजारी असलेल्या खैरणे आणि कोपरी या दोन गावांच्या नाव जोडीने कोपरखैरणे अशी ओळख या गावाची झाली असावी असे म्हटले जाते. ठाणे बेलापूर पट्टीत शिक्षणाला मुळे या गावाला एक चांगली ओळख निर्माण झालेली आहे.

सातवीपर्यंत शाळा गावात होती. त्यानंतर तरुणांनी तुर्भे व घणसोलीची वाट चोखाळली. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार गावात चांगला झाला. जुन्या मोडी भाषेत वाचन लिखाण करणारे विष्णुपंत पंगारी म्हात्रे पासून ते गावातील पहिले पदवीधर म्हणून अ‍ॅड. पी. सी पाटील यांचा आवर्जून उल्लेख केला जात आहे. पाटील यांनी नंतर कायदेविषयक, शैक्षणिक तसेच प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात बरेच काम केले. याच गावाने पंचक्रोशीतील पहिला डॉक्टर म्हणून राजेश पाटील यांचा गौरव केला आहे. गावात यशवंत अंबाजी म्हात्रे यांचे एक असे कुटुंब आहे. ज्या घरातील मुले, मुली आणि सुना असे चार जण डॉक्टर आहेत तर नीलेश मधुकर पाटील ह्य़ा तरुणाने गावातील पहिला अभियंता होण्याचा मान पटकाविला आहे. त्यामुळे गावाला एक शैक्षणिक परंपरा लाभली असून गावात अनेक डॉक्टर, वकील आणि इंजिनीअरिंगच्या तरुणांनी शिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे याच गावातील स्नुषा कीर्ती पाटील ही आयएएसच्या प्रशिक्षणासाठी सिडकोच्या साहाय्यामुळे सध्या दिल्लीत आहे. राजकीय पटलावर अनेक ग्रामस्थांनी आपला ठसा उमटविला आहे. याची सुरुवात पहिले सरपंच भालचंद्र नाना पाटील यांनी केली आहे. क्रीडा क्षेत्रात महेंद्र सुतार यांच्या मुलांनी कराटेमध्ये अटकेपार झेंडा फडकाविला आहे. त्यामुळे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात गावाचे नाव उज्ज्वल आहे. दहा-अकरा एकरवर असलेले हे गाव आता शंभर एकरच्यावर कधी पसरले ते कळलेच नाही. गाव आता चारही बाजूने शहरीकरणाच्या वेढय़ात लपेटले गेले आहे. विशेष म्हणजे या गावापासून समुद्रातील हालचालींवर टेहळणी करता यावी म्हणून पेशवाईत टेहळणी बुरुज बांधण्यात आले होते. हे बुरुज थेट शिळफाटा मार्गापर्यंत होते. त्यातील गावातील एक बुरुज जमिनीच्या हव्यासापोटी बुजविण्यात आला. त्याचे साधे नामशेषदेखील शिल्लक ठेवण्यात आलेले नाही. गावातील मारुती मंदिराच्या मागच्या बाजूला हा बुरुज होता असे ग्रासस्थ सांगतात.

गावात हनुमानाचे जुने मंदिर आहे. त्याचबरोबर गावची देवी रांजनदेवी आणि चिकणेश्वर अशी तीन मंदिरे आहेत. हनुमान जयंतीचा कार्यक्रम मोठय़ा धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्याच पद्धतीने देवीची जत्रा आणि होळी उत्सव मोठय़ा प्रमाणात ग्रामस्थ आजही साजरा करतात. गावच्या जत्रेला संपूर्ण गावाच्या एका बकऱ्याचा बळी दिल्यानंतर त्याचा प्रसाद म्हणून गावात वाटण्याची परंपरा होती, मात्र ती आता लोप पावली आहे. बाजारहाटासाठी ग्रामस्थ सर्वस्वी ठाण्यातील बाजारपेठेवर अवंलबून होते. त्यासाठी पायी ठाणे गाठले जात होते. लोकसंख्येने मोठे असलेल्या या गावात कधी तंटा झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे तंटामुक्त गाव म्हणून ग्रामस्थांना अभिमान आहे.

[jwplayer afMIXRhq]