नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात दुपारी अविश्वासाचा ठराव मांडण्यात येणार असल्याने मुख्यालय परिसरात सकाळी सात वाजल्यापासून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी मुख्यालय परिसरात १०० मीटपर्यंत वाहनांना बंदी घालण्यात आली होती. केवळ नगरसेवक, पालिका अधिकारी-कर्मचारी आणि पत्रकारांना ओळखपत्र दाखवल्यानंतर पालिकेत प्रवेश दिला जात होता. या वेळी पालिका मुख्यालयासमोर एनआरआय पोलीस ठाण्याच्या आवारात पालिका कंत्राटी कर्मचारी, प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, माथाडी कामगार, व्यापारी, फेरीवाले, झोपडपट्टीधारक, ठेकेदारांनी मुंढेंविरोधात घोषणा देत पालिका मुख्यालय परिसर दणाणून सोडला. ऑक्टोबर हिटच्या कडक उन्हामध्ये मुंढे समर्थक व विरोधकांनी मुख्यालयाबाहेर हजेरी लावली. यावेळी मुंढेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर मुंढे समर्थकांनी तुकाराम मुंढे जिंदाबाद अशी घोषणाबाजी दिली.

मंगळवारी १२ वाजता विशेष सर्वसाधारण सभेमध्ये अविश्वासाचा ठराव सादर करण्यात येणार होता. पण ११ वाजल्यापासून नगरसेवक पालिका मुख्यालयात येण्यास सुरुवात झाली. एकाही नगरसेवकाने सभेला दांडी मारलेली नव्हती. या वेळी पालिका मुख्यालयाबाहेर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप आणि आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते. पालिका मुख्यालयाच्या बाहेर प्रकल्पग्रस्त नेत्यांनी टाळमृदंगाचा गजर केला. या वेळी आयुक्तांविरोधात काहींनी फलक उंचावून निषेध व्यक्त केला.

दुपारी एकच्या सुमारास आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर विरोधकांनी फटाके फोडले. हा आनंद साजरा करण्यासाठी पेढे वाटण्यात आले. काही वेळाने पोलिसांनी नृत्य करणाऱ्या लोकांना थांबवले. या काळात मुख्यालयासमोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

कंत्राटी कामगारांकडे खासदारांची पाठ

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी प्रशासनाविरोधात सोमवारपासून चार दिवस रजा आंदोलन सुरू केले आहे. यावेळी पालिका मुख्यालयाबाहेर महापालिकेच्या सर्वच विभाग कार्यालयांच्या बाहेर विविध अस्थापनांतील कंत्राटी कामगारांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला, पण आयुक्तांना मात्र समर्थन दिले. पालिका मुख्यालयाच्या येथे खासदार राजन विचारे आले असता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पुढे गेले, पण कंत्राटी कामगारांकडे मात्र पाठ फिरवली. यामुळे कंत्राटी कामगारांनी नाराजी व्यक्त केली.