नवी मुंबई पोलीस दलातील ६५० पोलीस शिपायांना मागील २० महिन्यांचा थकित घरभाडे भत्ता अद्याप मिळालेला नाही. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या हेमंत नगराळे यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा आणि शहर आयुक्तालयात २०१२ साली भरती झालेल्या शिपायांच्या वेतनात घरभाडे भत्ता मिळाला; परंतु नवी मुंबई पोलीस दलात तो शिपायांना दिला गेला नाही. अखेर नवी मुंबईच्या २०१२ सालच्या पोलीस शिपायांनी नवी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद आणि प्रभात रंजन यांच्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे एप्रिल २०१५ पासून घरभाडे भत्ता मिळू लागला. त्याच वेळी थकित २० महिन्यांचा घरभाडे भत्ता लवकरच देण्याचे आश्वासन तत्कालीन आयुक्तांनी दिले होते. मात्र ते आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. काही शिपायांना पोलीस वसतिगृहात घरे मिळाल्याने त्यांना हा घरभाडे भत्ता लागू होत नाही. मात्र ग्रामीण भागातून नवी मुंबईत नोकरी निमित्त आलेल्या या पोलीस शिपायांनी खोल्या भाडय़ाने घेऊन त्यामध्ये सामूहिक पद्धतीने राहत आहेत. काहींनी आपले कुटुंबासाठी भाडय़ाच्या खोल्या घेऊन सरासरी ६ हजार रुपयांहून अधिकचे भाडे भरून राहत आहेत. सध्या या पोलीस शिपायांना २१ हजार रुपये वेतन व वेतनभत्ते मिळतात. २० महिन्यांचा घरभाडय़ाचा थकित भत्ता मिळाल्यास ५० ते ५४ हजार रुपये रक्कम या पोलिसांना मिळेल. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयाच्या वेतनभत्त्यामधून २०१२ सालच्या भरतीमधील शिपायांना थकित घरभाडे दिल्यास साडेतीन कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्याची लेखा विभागाला गरज आहे. याबाबत नवी मुंबईचे पोलीस मुख्यालय (प्रभारी) दिलीप सावंत म्हणाले, की सामान्य शिपायांची काही अडचणी असल्यास त्यांनी निरीक्षकांकडे वा आस्थापना विभागात संपर्क साधल्यास त्यांच्या तक्रारींवर नक्कीच प्राधान्य देऊन त्यांच्या अडचणी सोडविल्या जातील.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House rent allowance tired by police in navi mumbai
First published on: 27-05-2016 at 02:25 IST