घरांचे दर प्रति चौरस फूट २० हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता; व्यावसायिक गाळ्यांची किंमत दुप्पट होणार?

नवी मुंबईचा कंठहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावरील सानपाडा येथील भूखंडाला आलेला चढा भाव हा केवळ वाणिज्यिक वापराचा समावेश असल्याने आला असल्याची चर्चा आहे. या भुखंडामुळे पामबीच मार्गावर व्यावसायिक गाळ्यांची निर्मिती करणे शक्य असून विकासकाला ते परवडणारे आहे. या भुखंडावर उभ्या राहणाऱ्या इमारतीतील घरांची किंमत २० हजार रुपये प्रति चौरस फूट दरापर्यंत जाण्याची शक्यता आहे तर व्यावसायिक वापरातील गाळे या दराच्या दुप्पट दराने विकली जाणार असल्याचे बांधकाम क्षेत्रातील जाणकरांचे मत आहे.

सिडकोने पामबीच मार्गावरील सानपाडा सिग्नलजवळ एका शिल्लक भूखंडाची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. बांधकाम क्षेत्रातील आर्थिक मंदीमुळे या भूखंडाला फारशी किंमत येणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात होता.  सिडकोची या भागात आरक्षित किंमत ९० हजार रुपये प्रति चौरस मीटर असल्याने त्यापेक्षा दुप्पट दर अपेक्षित धरण्यात आला होता; पण या भूखंडाला तीन लाख ३३ हजार रुपये प्रति चौरस मीटर दर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पामबीच मार्गाला लागून एकही वाणिज्य वापराची इमारत नाही. अंतर्गत रस्यावर काही वाणिज्य वापरामुळे हॉटेल सुरू करण्यात आले आहेत पण त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद नाही. सिडकोने विक्रीस काढलेल्या सानपाडा येथील भूखंड क्रमांक एक हा अतिशय मोक्याचा भूखंड असल्याने या परिसरात चार इमारतींचा विकास केलेल्या ‘भुमीराज इन्फ्रास्ट्रक्चर’ने   भुखंडाची चढय़ा दराने खरेदी केली. त्यामुळे पामबीच मार्गावर पहिल्यांदाच वाणिज्य वापर होणार असून येथील या वाणिज्यिक वापराला चांगला भाव प्राप्त होणार आहे. पामबीच मार्गावर सध्या घरांसाठी १५ ते २० हजार रुपये प्रति चौरस फूट दर आहे. तोच दर या इमारतीत दुप्पट होण्याची शक्यता आहे. घरांचा दर इतका चढा असल्याने वाणिज्य वापरातील गाळ्याची किंमत करोडोंच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पामबीच मार्गावर अनेक बडय़ा व्यावसायिकांची घरे असून मुंबईतील वाळकेश्वर, मरीन ड्राइव्ह येथील घरांच्या किमतीशी येथील घरांची तुलना केली जात आहे.

आर्थिक मंदीच्या काळात पामबीच मार्गावर आलेला हा दर आश्र्चयजन आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रात पुन्हा अच्छे दिन येण्याची आशा पल्लवित झाली आहे मात्र हा पामबीच मार्गावर भूखंड असल्याने इतका दर प्राप्त झाला आहे.

योगेश झंवर, सल्लागार, रियल इस्टेट, नवी मुंबई</strong>