आयुक्तांच्या बदलीविषयी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा सवाल; नागरिकांतही नाराजी

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या बदलीचे वृत्त येताच पनवेलमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेलचे पदाधिकारी सतीश पाटील यांनी आयुक्त शिंदे यांच्या कारभारावर ठाम विश्वास दर्शवत मंत्र्यांच्या नातेवाईकांनी सनदी अधिकारी व्हायचेच नाही का, असा उलट प्रश्न उपस्थित केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त शिंदे यांना अभय द्यावे, अशी मागणी केली.

गेल्या वर्षी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर पनवेल महापालिकेची स्थापना झाली. नगरपालिका आणि २९ महसुली गावे असा परिसर त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. पालिका स्थापनेपासूनच्या १२० दिवसांच्या कारभारादरम्यान आयुक्त शिंदे यांनी अपुऱ्या मनुष्यबळात दिवस-रात्र काम करून स्वच्छ महापालिकेकडे वाटचाल सुरू ठेवली. पहिल्याच दिवशी त्यांनी हातामध्ये झाडू घेऊन पनवेलचे रस्ते स्वच्छ करण्याचा संकल्प सोडला. ज्या परिसरात अस्वच्छता दिसेल, तिथल्या सफाई कामगारांची वेतन कपात करण्यात आली. उरणफाटय़ावर तब्बल ३० वर्षे रस्ता अडवून बसणाऱ्या कोळणींना त्यांनी आत बसण्यास भाग पाडले. त्यामुळे आज उरणफाटय़ाचा परिसर मोकळा झाला आहे. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना साफसफाई करावी लागत असे, मात्र आयुक्तांनी शिक्षकांपासून ते मुख्याध्यापकांपर्यंत सर्वाना शिस्त लावून विद्यालयांमध्ये स्वच्छ वातावरण निर्माण केले. भाजी मार्केटमध्ये बेकायदा फेरीवाल्यांमुळे सामान्यांना चालण्यास जागा मिळत नव्हती.

आयुक्तांच्या शिस्तीच्या बडग्यामुळे सहा जणांनी स्वेच्छानिवृत्ती व रुग्णता निवृत्तीचे अर्ज केले. आयुक्तांनी १५ वर्षे चतुर्थश्रेणीचे काम करणाऱ्या तब्बल २०० कंत्राटी कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी व भत्त्यांचा आधार दिला.

आयुक्तांची कारवाई..

  • आयुक्तांनी फेरीवाले व त्यांच्या प्रतिनिधींना प्रशासकीय हिसका दाखवला. शिवाजी पुतळा ते भाजी मार्केट परिसर मोकळा झाला. याच रस्त्यावर फेरीवाल्यांनी ३० ते ४० वर्षे बस्तान मांडले होते. खांदेश्वर येथील कलिंगड नाका येथील ४० वर्षांपासूनची अतिक्रमणे त्यांनी हटवली.
  • शहरात दुकानदारांनी मार्जिनल स्पेसवर छत उभारून त्या बळकावल्या होत्या. आयुक्तांनी तब्बल २,७०० नोटिसा बजावून २७ लाखांचा दंड वसूल केला आणि जागा खुली करून घेतली. राजकीय पक्षांच्या कार्यालयांवरही ही कारवाई करण्यात आली.
  • तब्बल पंधरा हजार बेकायदा फलक काढून टाकण्यात आले. त्यामुळे दिशादर्शक फलकांनी मोकळा श्वास घेतला.
  • फडके नाटय़गृहाशेजारील सरस्वती विद्यालयाचा वापर यापूर्वी अतिरिक्त वाहने उभी करण्यासाठी केला जात होता. आयुक्तांनी ही वाहने हटवली आणि तेथील भिंतींवर सुंदर चित्रे रेखाटण्यात आली.