दिघ्यातील ‘दुर्गामाता प्लाझा’, ‘अमृतधाम’ सिडकोकडे हस्तांतरित

दिघा येथील  सिडकोच्या भूखडांवरील दुर्गामाता प्लाझा व अमृतधाम या कोर्ट रीसिव्हरच्या ताब्यात असणाऱ्या इमारतींना मंगळवारी सील करण्यात आले. या इमारती सिडकोच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. २ मार्च रोजी अवधूत छाया व दत्तकृपा या इमारतीही सील करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोच्या आधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईनंतर दुर्गामाता प्लाझामधील ५०, अमृत धाममधील ४२, अवधूत छायामधील ४६, दत्तकृपामधील २४ अशी एकूण १६२ कुटुंबे बेघर झाली आहेत. त्यांनी भाडय़ाची घरे शोधण्यास सुरुवात केली आहे.

उच्च न्यायलयाने सिडको व एमआयडीसीच्या भूखंडांवरील ९९ अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीच्या जागेवरील पार्वती, शिवराम व केरू प्लाझा या तीन निवासी इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. तर अंबिका, कमलाकर, पांडुरंग, मोरेश्वर, भगतजी या इमारती आधीच सील करण्यात आल्या आहेत. सिडकोच्या भूखंडावरील चार इमारती कोर्ट रीसिव्हरच्या ताब्यातून सिडकोच्या ताब्यात देण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यापैकी मंगळवारी दुर्गामाता प्लाझा व अमृतधाम या इमारतींना टाळे ठोकण्यात आले. त्यानंतर दुर्गा माता प्लाझा इमारतीच्या बाजूलाचा असणाऱ्या देवीच्या मंदिरात काही रहिवाशांनी आपले सामान ठेवले होते. तर काही जण टेम्पोमध्ये सामान भरत होते. या वेळी पं्रचड पोलीस बंदोबस्त होता. अग्निशमन दल व रुग्णवाहिकाही तैनात होत्या. गेल्या आठवडय़ात मोरेश्वर, भगतजी व पांडुरंग इमारतींमधील कारवाई रोखण्यासाठी येथील नागरिकांनी रस्ता रोको व रेल रोको केले होते. त्या वेळी नागरिकांना आंदोलनसाठी उद्युक्त करणाऱ्या राजकीय नेत्यांची नावे न्यायलयात सादर करण्याचे आदेश उच्च न्यायलयाने दिले होते. त्यामुळे मंगळवारी करण्यात येणाऱ्या कारवाईच्या वेळी नागरिकांकडून तसेच राजकीय नेत्यांकडून विरोधत झाला नाही. शांततेत कारवाई पार पडली.

२ मार्च रोजी सिडकोच्या भूखंडावरील अन्य दोन इमारतींना टाळे ठोकण्यात येणार आहे. एमआयडीसीच्या भूखंडावरील अगिवली हाइट्स, सावित्री, सीताराम पार्क, नाना पार्क, कल्पना हाइटस, लाल किल्ला, एकविरा या इमारतीदेखील कोर्ट रीसिव्हरच्या ताब्यात आहेत. त्याही मार्चमध्ये सील करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ऐन परीक्षांच्या काळात सुरू असणाऱ्या या कारवाईमुळे आता जायचे कुठे, असा प्रश्न दिघावासींयासमोर आहे.

 

दिलासा देण्यासंदर्भातील अर्ज मागे

७ मार्च रोजी राज्य सरकारने मांडलेल्या संरक्षण धोरणावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत दिलासा देण्यात यावा, अशी मागणी येथील राहिवाशांनी न्यायलयाकडे केली होती. त्यावर अर्जाच्या गुणवत्तेवर सुनावणी घेऊन निर्णय देऊ आणि तो टिकला नाही, तर अर्जदांराना मोठा दंड ठोठावू, असे न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले होते. त्यामुळे अर्जदाराने अर्ज मागे घेतला व मंगळवारी कारवाई सुरू झाली.

वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींवर हल्ला

दिघा येथील अनधिकृत इमारती सील करून सिडकोकडे देण्याच्या घटनेचे वार्ताकन करण्यासाठी आलेल्या एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आणि कॅमेरामन संदीप भारती यांच्यावर दिघ्यातील रहिवाशांनी हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर दिघ्यातील विघ्नहर रुग्णालयात उपचार करण्यात आले. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.