वाहतूक पोलीस विभाग मात्र डोळे मिटून; राजकीय पुढाऱ्यांचा आशीर्वाद
ऐरोली परिसरात राष्ट्रवादी आणि शिवसेना रिक्षा युनियनच्या बेकायदा रिक्षा थांब्यांमुळे वाहतुकीची नवी समस्या उभी राहिली आहे. रिक्षा संघटनांनी मिळेल त्या चौकात आणि रेल्वे स्थानक परिसरात थांबे तयार केले आहेत. विशेष म्हणजे, ऐरोलीतील सेक्टर-२० मध्ये तब्बल १२ हून अधिक बेकायदा रिक्षा थांबे उभारले गेले आहेत. या उभारणीला राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप यातील एकाही थांब्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली नाही.
ऐरोलीतून मुंबई आणि ठाण्यासाठी प्रवासी शेअर रिक्षा करतात. याशिवाय ऐरोलीत मीटर रिक्षा उपलब्ध आहे. दोन्ही रिक्षाचालकांनी राजकीय पुढाऱ्यांच्या आधाराने थांबे निर्माण केले आहेत. स्थानक परिसरात पूर्व आणि पश्चिमेकडे दोन रिक्षा थांबे अधिकृत आहेत. मात्र स्थानक आगार परिसरात दोन दोन, तर सेक्टर ५ मध्ये सहकार बाजार, पेट्रोल पंप सिग्नल, सेक्टर १७, दिवा सर्कल पूल, ऐरोली नाका परिसर तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली रेल्वे स्थानक पदपथावर, माइंड स्पेस, अक्षरा कंपनी या ठिकाणांवरील थांबे विनापरवाना आहेत. विशेष म्हणजे या थांब्यावर नवी मुंबईतील राजकीय पुढाऱ्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. पुढाऱ्यांच्याच आशीर्वादाने ठाणे-कळवा परिसरांतील अनेक रिक्षाचालक जादा पैशाच्या आमिषापोटी नियम डावलून ऐरोली परिसरात बिनधाकपणे रिक्षा चालवत आहे. रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत आहेत. स्थानिक पोलीस नाकाबंदीच्या नावावर या रिक्षांची तपासणी केली जात आहे; मात्र आरटीओ आणि वाहतूक पोलीस त्यांच्याकडे काणाडोळा करीत आहेत. काही रिक्षाचालक गणवेश न घालता व्यवसाय करीत आहेत.

मनमानी भाडेवाढ
ऐरोली परिसरातील रिक्षाचालकांनी डिझेलचे भाव वाढल्याचे कारण पुढे करत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षाचालकांनीही यात हात ओले करत किमान आठ रुपये असणारे भाडे दहा रुपयांवर नेले आहे. ‘मुकंद आयर्न’ कंपनी ते सेक्टर ५ परिसरात १० रुपये असणारे भाडे वाढवून १५ रुपये आकारले जाते, तर ४ ते ५ प्रवासी घेऊन आरटीओच्या नियमांना न जुमानता प्रवाशांची लूट करीत आहेत.

ऐरोली परिसरात बेकायदा रिक्षा थांब्यांची माहिती मागवून पुढील आठवडय़ात आरटीओच्या विशेष पथकांकडून कारवाई करण्यात येईल.
संजय धायगुडे, नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी