सतरा प्लाझा येथील स्थिती; पाम बीचवरील प्रवेशद्वारे अजूनही खुलीच

सतरा प्लाझा येथील बेकायदा वॅलेट पार्किंगवर महिनाभर सुरू असलेली कारवाई पालिकेने १३ ऑक्टोबरला थांबवल्यानंतर अवघ्या चार दिवसांत पुन्हा वाहने उभी करण्यात येऊ लागली आहेत. दुकानांचे पाम बीच मार्गाच्या दिशेने असलेले प्रवेशद्वार बंद करण्याच्या नोटिसा बजावल्यानंतरही अद्याप कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे बेकायदा पार्किंग सुरूच आहे.

पालिका आणि वाहतूक विभागाने ८ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत सतरा प्लाझा येथील बेकायदा पार्किंगविरोधात धडक मोहीम राबवली. पालिकेने या कारवाईतून २ लाख ८५ हजार रुपये एवढी दंडात्मक रक्कम वसूल केली. वाहतूक पोलिसांनी सुरुवातीला तात्पुरती कारवाई केली. पालिकेने वाहतूक विभागाच्या मदतीने लाखोंची दंडवसुली केली. त्यामुळे बेकायदा पार्किंगला आळा बसला. १३ ऑक्टोबरपासून ही कारवाई थांबवण्यात आली. त्यामुळे या रस्त्यावर पुन्हा बेकायदा पार्किंग सुरू झाले आहे.

सतरा प्लाझा परिसरात दिवाळीत खरेदीसाठी मोठय़ा संख्येने ग्राहक येत आहेत. त्यामुळे तिथे अनेक वाहने पार्क केली जात आहेत. कारवाई थांबताच पुन्हा तिथे पार्किंग करण्यात येऊ लागले आहे.

या परिसरातील वेअर हाऊस, विविध हॉटेल, मॉलचे प्रवेशद्वार आराखडय़ानुसार पामबीच रस्त्याच्या बाजूला नसून ते मागील सेवा रस्त्याच्या दिशेला आहे. तरीही नियम धाब्यावर बसवून व्यावसायिक वापरासाठी या ठिकाणच्या दुकानांचे प्रवेशद्वार पामबीच मार्गाच्या बाजूला काढण्यात आले आहे. याबाबत पालिकाही ठोस उपाययोजना करण्याच्या पवित्र्यात असून या विभागात पालिकेने नोटीसही पाठवल्या आहेत.

सतरा प्लाझा व परिसरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा पार्किंग केले जात होते. पालिकेने दुकाने सील केली आणि पार्किंगवर मोठी कारवाई केली. यापुढेही सातत्याने कारवाई केली जाणार आहे. चुकीच्या दिशेने काढलेली प्रवेशद्वारे बंद करण्यासाठी परिसरात भिंत बांधणार आहोत. व्यावसायिकांना ही बेकदायदा प्रवेशद्वारे बंद करण्यासंदर्भात नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यांनी प्रवेशद्वारे बंद न केल्यास त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील. पामबीच मार्गावरील प्रवेशद्वारे कायमची बंद करण्यावर पालिका ठाम आहे.

– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त , नमुंमपा

नवी मुंबई महापालिकेने कोपरी पुलापासून ते बिकानेर चौकापर्यंत नोपार्किंगचे ९८ फलक लावले आहेत. कारवाई सुरू असताना फक्त रस्त्याच्या कडेला एकेरी पार्किंग केले जात होते. मुख्य रस्त्याच्या दिशेला नियमानुसार भिंत बांधण्याचे आदेश अभियंता विभागाला मिळाल्यानंतरच योग्य कार्यवाही करण्यात येईल.

– मनोज पाटील, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महापालिका