नवी मुंबई पालिका क्षेत्रात मोक्याच्या विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या दोनशे साठ सीसी टीव्ही कॅमेरांसाठी बेलापूर येथील पोलीस मुख्यालयात एक नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. मात्र हा कक्ष अपुरा पडत असल्याने सिडको याच आयुक्तालयाच्या आवारात एक स्वतंत्र सीसी टीव्ही नियंत्रण कक्ष पोलिसांना बांधून देणार आहे. सिडको खारघर, पनवेल, उलवा या दक्षिण स्मार्ट सिटी भागांत दोनशे अडुसष्ट सीसी टीव्ही लावणार असून त्यावर दहा कोटी ९० लाख रुपये खर्च करणार आहे. हे कॅमेरे लंडन शहरातील कॅमेरांसारखे असून शहरातील इत्थंभूत घडामोडी या कॅमेरात टिपल्या जातील.

राज्यात सर्वप्रथम नवी मुंबई पालिकेने शहरात सीसी टीव्ही लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी पालिकेने सात कोटी रुपये खर्च करून शहरात दोनशे साठ ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याची जोडणी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली असल्याने गेल्या तीन वर्षांत सुमारे पाचशे गुन्ह्य़ांत त्यांचे फुटेज उपयोगी ठरले आहे. बेलापूर येथील पोलीस नियंत्रण कक्षात हे सीसी टीव्ही फुटेज चोवीस तास पाहिले जात असून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच धर्तीवर सिडको खारघर, पनवेल, कळंबोली, द्रोणागिरी, उलवे, आणि कामोठे या सिडको नोडमध्ये दोनशे अडुसष्ट सीसी टीव्ही लावणार आहे. गुन्हा करून पळून जाणाऱ्या वाहनांचे क्रमांक काही क्षणांत या कॅमेरात टिपले जाणार असल्याने नियंत्रण कक्षाला काही मिनिटांत गुन्ह्य़ांची माहिती मिळणार आहे. हे कॅमेरे चोरीला जाऊ नयेत यासाठी त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. पालिका आणि सिडकोच्या सर्व कॅमेरांची माहिती एकाच ठिकाणी संकलित व्हावी यासाठी सिडको एक अद्ययावत स्वतंत्र नियंत्रण कक्ष पोलिसांना बांधून देणार आहे. दोन्ही प्राधिकरणांनी लावलेल्या सीसी टीव्ही कॅमेरांची संख्या ५०० पर्यंत जात असून पालिका आणखी सीसी टीव्ही लावण्याचा विचार करीत आहे. या दोन्ही संस्थांसाठी एकच पोलीस आयुक्तालय असल्याने सिडकोने ही व्यवस्था केली आहे.