भेंडी, गवार, फरसबी, कारली, ढोबळी मिरची, पडवळ, मटार महाग

गेल्या दोन दिवसांत वाढलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे वाशी येथील घाऊक बाजारात येणाऱ्या भाज्यांचे प्रमाण कमी झाले आहे. परप्रांतांतून येणाऱ्या काही भाज्या खराब होऊ लागल्या आहेत. भाज्या खराब होण्याचे प्रमाण २० टक्के आहे. कमी पुरवठय़ामुळे भेंडी, गवार, फरसबी, कारली, ढोबळी मिरची, पडवळ, मटार, कढीपत्ता या भाज्यांच्या दरात २०-२५ टक्के वाढ झाली आहे. याउलट टोमॅटो, भोपळा, फ्लॉवर, गाजर, काकडी ह्य़ा भाज्या स्वस्त आहेत. जूनमध्ये भाज्यांचे भाव आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदा मान्सून लवकर येण्याचे अंदाज वर्तविले जात आहेत, मात्र सध्याच्या झळा भाज्यांसाठी मारक ठरत आहेत. राज्यातील उत्तर व पश्चिम भागांत कमी झालेला पाणीसाठा आणि दिल्ली, गुजरातमधून येणाऱ्या भाज्या प्रवासात खराब होण्याचे वाढते प्रमाण पाहता घाऊक बाजारात येणाऱ्या भाज्यांच्या ट्रकची संख्या १५०ने घटली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होऊ लागल्याने काही भाज्यांचे दर दहा ते पंधरा रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत.

सर्वसाधारपणे तीन ते चार रुपये जुडीने मिळणारा कढीपत्ता आता १०-१२ रुपयांनी विकला जात आहे. गवार, कारली, ढोबळी मिरची, पडवळ, फरसबी यासारख्या भाज्याही घाऊक बाजारात सरासरी १५ ते २० रुपये प्रति भावाने विकल्या जात आहेत. उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या टोमॅटोची किंमत मात्र घटली असून टोमॅटो नऊ ते दहा रुपये किलोने विकले जात आहेत.

हीच स्थिती भोपळा, फ्लॉवर, गाजर, काकडी या भाज्यांची आहे. नवीन उत्पादन येण्यास वेळ लागणार असल्याने जून महिन्यात भाज्या थोडय़ाशा महागच मिळणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मटार, भेंडी कडाडली

भेंडी तर २२ ते २६ रुपये प्रति किलोने घाऊक बाजारात विकली जात आहे. किरकोळ बाजारात ती ३० ते ३५ रुपये प्रति किलोने मिळत आहे. भेंडीपेक्षा हिरवे मटार महाग झाले असून ते ४५ ते ५६ रुपये प्रति किलोने घाऊक बाजारात उपलब्ध होत आहेत. त्यात २० टक्क्याने वाहतूक खर्चाची भर पडत असल्याने किरकोळ बाजारात हिरव्या मटार परवडण्यासारखे नाहीत.