नवीन पनवेल परिसरातील आकुर्ली, आदई, चिपळे आणि विहीघर या गावांलगत जमिनीवर गृहप्रकल्प उभारण्याची जाहिरात करून गुंतवणूकदारांना १ ते १० लाखांना फसवणाऱ्या बालाजी ग्रुपच्या मालकाविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. या वेळी गुंतवणूकदारांनी शुक्रवारी आदई सर्कलवर पोलीस ठाण्याच्या इमारतीपर्यंत मोर्चा काढला. सुमारे ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप या गुंतवणूकदारांनी केला आहे.
पनवेल पूर्व येथील रेल्वेस्थानकासमोर आणि आदई सर्कल येथे या बालाजी ग्रुपचे कार्यालय आहे.
२०११ पासून या कार्यालयातून गुंतवणूकदारांकडून १५ लाख रुपयांत वन बीएचके आणि २२ लाखांत टू बीएचके घर देतो असे सांगून बुकिंगचे ५ ते १० लाख रुपये बालाजी ग्रुपमध्ये सामान्यांनी जमा केले. आकुर्ली (सुकापूर) येथील बालाजी रेसिडन्सी, आदई येथील बालाजी कलश, चिपळे गावाजवळील बालाजी ड्रीम सिटी आणि विहीघर गावाजवळील बालाजी सिटी व पद्मदर्शन या नावाने गृहसंकुल उभारून यात लवकरच सदनिका बांधून देतो, असे आश्वासन दिल्याचा आरोप या गुंतवणूकदारांनी केला. कामोठेमधील सतीशकुमार भोसले यांची पाच लाख रुपयांना फसवणूक झाली आहे.