पनवेलच्या ग्रामीण परिसरात आणि सिडकोच्या कामोठे वसाहतीमध्ये काविळीच्या साथीने शेकडो रुग्ण आजारी असल्याने येथील नागरिक हवालदिल झाले आहेत.

पावसाळ्याच्या पहिल्याच आठवडय़ात ताप, काविळीसारखे साथीचे आजार पसरल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा ढिम्म कारभार समोर येत आहे. कामोठे येथील भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेऊन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांना आरोग्य यंत्रणेला कामाला लावण्यासाठी निवेदन देऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

कामोठे येथील सेक्टर १४ मधील तुळशी नारायण या इमारतीमधील ३ कुटुंबांमध्ये काविळीचे रुग्ण आढळले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी आरोग्याची ही समस्या सोडविण्यासाठी स्थानिक डॉक्टरांच्या संघटनेशी संपर्क साधला. कामोठे वसाहतीचे भाजपचे अध्यक्ष डॉ. अरुणकुमार भगत हे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे वसाहतीमध्ये सर्वाधिक रुग्ण काविळीचे असल्याबद्दलची तक्रार खुद्द डॉक्टरांनी सिडकोकडे केली आहे. कामोठेसारखीच परिस्थिती तळोजा औद्योगिक वसाहतीला खेटून असलेल्या घोट, नितळस, तोंडरे या गावांमधील सामान्य कामगारांची आहे. येथे तापाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आहेत.

तेथील अनेक जणांना दूषित पाण्यामुळे कावीळ झाल्याचे येथील डॉक्टर सांगतात. याबाबत तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इतकरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक चव्हाण यांनी या आरोग्य समस्येची गंभीर दखल घेतली असून त्यांनी शुक्रवारी कामोठे परिसरात विविध सेक्टरमध्ये जिल्हा मलेरिया कार्यालयाच्या पर्यवेक्षकांकडून संबंधित परिसरात किती काविळीचे व साथीच्या आजाराचे रुग्ण आहेत याची माहिती घेण्याचे काम हाती घेतले.

रुग्णांची आकडेवारी मिळाल्यानंतर सिडकोच्या आरोग्य विभागातर्फे तेथे तातडीने उपाययोजना करणार असल्याचे सिडकोचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बावस्कर यांनी सांगीतले.