जेएनपीटी बंदरात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या वेतनकराराला मुदतवाढ द्यावी व कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी शुक्रवारी कंत्राटी कामगारांनी प्रशासन भवनावर मोर्चा काढला होता. यावेळी कंत्राटी कामगारांना महागाईनुसार वेतन, भत्ते तसेच बोनस व सुट्टय़ा मिळाव्यात अशी मागणी कंत्राटी कामगारांच्या न्हावा शेवा बंदर कामगार संघटनेने केली. या मोर्चानंतर जेएनपीटीमधील कंत्राटी कामगारांचे वेतन निश्चित करणाऱ्या समितीसोबत कामगार नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत विविध मागण्यावर चर्चा करण्यात आली.
केंद्र सरकारने कंत्राटी कामगारांचे वेतन किमान पंधरा हजार असावे असे म्हटले आहे. मात्र गेली पंचवीस वर्षे कायम कामगारांचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला हवा तसा मिळत नाही. यामध्ये सफाई, पाणी पुरवठा, रुणालय, विद्युत पुरवठा आदी विभागात काम करणाऱ्या महिला कामगारांचा समावेश आहे. यासाठी न्हावा शेवा बंदर कामगार संघटना (अंतर्गत) या संघटनेने लढा चालविला आहे. त्यामुळेच सध्या जेएनपीटीमधील कंत्राटी कामगारांना ११ ते १२ हजार रुपये वेतन मिळत असले तरी वाढत्या महागाईत ते कमी असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी जेएनपीटीचे कामगार नेते भूषण पाटील यांनी केली आहे. वेतनकरार व अन्य मागण्यांवर ३० नोव्हेंबपर्यंत समाधानकारक तोडगा न निघाल्यास जेएनपीटीमधील सर्व कामगार संघटना बंदरातील कंत्राटी कामगार करीत असलेले काम बंद पाडतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कामगारांच्या मोर्चासमोर संघटनेचे अध्यक्ष मधुकर कोळी, उपाध्यक्ष प्रशांत भगत व कार्याध्यक्ष गणेश घरत यांनीही मार्गदर्शन केले. नेत्यांनी यावेळी कामगारांना एकजूट राखण्याचे आवाहन केले.