जेएनपीटी बंदरातील विविध विभागांत कंत्राटी कामगार काम करीत असून या कामगारांच्या मागण्यांसाठी १ डिसेंबरला लाक्षणिक संप करण्याचा इशारा देणारी नोटीस जेएनपीटी व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. जेएनपीटी जनरल कामगार संघटनेच्या नेत्यांनी सोमवारी जेएनपीटीचे अध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक तसेच संबंधितांनाही ही नोटीस देऊन कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे. या कालावधीत व्यवस्थापनाने चर्चा करून प्रश्न सोडविण्याचेही आवाहन संघटनेने केले आहे.
जेएनपीटी बंदरातील सफाई, रुग्णालय, दुरुस्ती, इलेक्ट्रिक तसेच इतर अनेक विभागांत कंत्राटी कामगार काम करीत आहेत. या कामगारांना किमान १५ हजार रुपये वेतन मिळावे, वैद्यकीय सेवा, भरपगारी सुट्टय़ा, गॅ्रच्युईटी, बोनस मिळावा आदी मागण्या जनरल कामगार संघटनेने केल्या असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, सचिव सुधीर घरत व जनार्दन बंडा यांनी दिली आहे. या संदर्भात वारंवार चर्चा करूनही जेएनपीटी व्यवस्थापन दुर्लक्ष करीत असल्याने संपाची नोटीस द्यावी लागल्याचाही दावा संघटनेच्या नेत्यांनी या वेळी केला आहे. जेएनपीटी बंदर तसेच कामगार वसाहत कार्यालये आदी ठिकाणी हे कामगार काम करीत आहेत.