सिडकोचे उच्च अधिकारी व खालापूर तालुक्यातील रहिवासी यांच्यामध्ये शुक्रवारी झालेल्या देशातील पहिल्या खासगी स्मार्ट सिटीच्या पूर्वप्राथमिक कच्च्या करारावर सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेक इन इंडियाच्या महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये प्रत्यक्ष करार होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्रात (नैना) येणाऱ्या या खासगी प्रकल्पात शेतकऱ्यांनी स्वेच्छेने चाळीस टक्के जमीन सिडकोला देण्याची तयारी दर्शवली असून त्या बदल्यात पायाभूत सुविधा आणि पावणेदोन वाढीव एफएसआय पदरात पाडून घेतला आहे. या स्मार्ट सिटीत दीड लाख घरनिर्मिती व पावणेदोन लाख रोजगार निर्मिती होईल असा विस्वास व्यक्त केला जात आहे.
राज्य शासनाने जानेवारी २०१२ रोजी रायगड जिल्ह्य़ातील २७० गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सिडकोला दिले आहे. नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रभावाखाली येणारी ही गावे असून सिडकोने या गावांचा दोन टप्प्यात विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा विकास आराखडा तयार झाला असून तो शासन मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच या आराखडय़ाला मंजुरी मिळणार आहे. सिडकोने या भागासाठी स्वेच्छा जमीन सहभाग जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी स्वेच्छेने चाळीस टक्के जमीन दिल्यास सिडको त्यांना रस्ते, गटार, पाणी, दिवाबत्तीसारख्या पायाभूत सुविधा देण्यास तयार आहे. यावर बोनस म्हणून सिडको शासनाकडून पावणेदोन वाढीव चटई निर्देशांकही देणार आहे. दहा हेक्टरसाठी प्रथम ही योजना जाहीर करण्यात आली होती, मात्र शेतकऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने तिची मर्यादा कमी करण्यात आली असून साडेसात हेक्टर करण्यात आली आहे. पनवेल उरण भागात सिडकोच्या या योजनेला विरोध होत असताना खालापूर तालुक्यातील खालापूर, महड, शिरवली, निंबाडे, विणेगाव अशा पंचक्रोशितील अकरा गावांचा सहभाग असलेली खालापूर स्मार्ट सिटी या योजनेसाठी तयार झाली आहे. येथील ग्रामस्थांनी गतवर्षी जून महिन्यात ग्रामसभेत असा ठराव करून शासनाला कळविला आहे. अकरा गावांतील ग्रामस्थांनी चार हजार हेक्टर जमीन त्यासाठी देण्याची तयारी सुरू केली आहे. याशिवाय वन व खासगी जमिनीचा अंतर्भाव करून ही देशातील पहिली स्मार्ट सिटी योजना तयार करण्यात आली आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्य़ातील मगरपट्टा या कुंटुबाने ही योजना प्रत्यक्षात आणली आहे, पण स्मार्ट सिटी योजना जाहीर झाल्यानंतर खासगी प्रकारची ही पहिलीच योजना आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात उतरलेल्या या योजनेला सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी मृतरूप दिले आहे. त्यासाठी अकरा गावांतील ग्रामस्थांबरोबर अनेक बैठका घेण्यात आलेल्या आहेत. त्यांना ही योजना समजावून सांगण्यात आल्याने त्यांनी पहिली खासगी स्मार्ट सिटी तयार करण्यास पुढाकार घेतला आहे. अकरा गावांतील काही सरपंच व सिडकोचे भाटिया आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी या योजनेच्या सामंजस्य कराराच्या कच्च्या मसुद्यावर सह्य़ा करण्यात आल्या आहेत. त्यानंतर ग्रामस्थांनी या मसुद्यावर सहमती दिल्यानंतर सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री सिडकोचे उच्च अधिकारी व खालापूर तालुक्यतील काही सरपंच सदस्य व या सिटीला आयाम देणारे आकार अभिनव कन्सल्टंटच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्क्या मसुद्यावर मेक इंडियाच्या कार्यक्रमात वांद्रे कुर्ला संकुलात सामंजस्य करार केला जाणार आहे.