गुडी पाडव्याच्या दिवशी विधिवत पूजा करून त्यातील चार आंबे देव्हाऱ्यात ठेवल्यानंतर मुंबईत हापूस आंब्याची पेटी रवाना करण्याची पद्धत कालबाह्य़ झाली असून काल्टरच्या या जमान्यात आंबा बाजारात लवकरात लवकर पाठविण्याच्या स्पर्धेमुळे नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याची आवक आता हळूहळू वाढू लागली आहे. देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला, अलिबाग येथील २० ते २५ पेटय़ा सध्या घाऊक बाजारात येऊ लागल्या असून त्यांची किंमत प्रति डझन एक हजार ते पंधराशे रुपये अशी आहे. ही आवक एप्रिलच्या माध्यान्हाला वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदा हापूस आंब्याचा हंगाम काहीसा कोलमडू लागला आहे. फलधारणेच्या काळात मोहर येऊ लागला असल्याने त्याचा परिणाम हापूस आंबा बाजारात उशिरा येण्यावर होणार आहे. आतापर्यंत फळधारणा चांगली होत असल्याने कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव न झाल्यास ह्य़ा वर्षी उत्पादन चांगले येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यात फळधारणेला लागणारी आवश्यक थंडी कोकणात चांगली पडली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हापूस आंब्याचे उत्पादन लवकर काढण्याची स्पर्धा कोकणात मागील काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे अलीकडे जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात हापूस आंब्याच्या पेटय़ा मुंबई बाजारात येण्यास सुरुवात होत असल्याचे दिसून येते. मागील महिन्यात आलेला हापूस आंब्याचा अपवाद वगळता जानेवारी महिन्यात कोकणातील विविध भागांतून २० ते २५ पेटय़ा बाजारात दररोज येऊ लागल्या असून त्यातील हापूस आंबा इथिलिन स्प्रे वापरून पिकविला जात आहे. खाण्यासाठी हा आंबा पूर्णपणे चांगला निघत नाही पण त्यातील ७० टक्के भाग खाण्यालायक होत असल्याने आंबा खवय्ये तो विकत घेत असल्याचे दिसून येते. याचा दर चार ते सात हजार पेटी, असा असून एका पेटीत आकाराप्रमाणे पाच ते सहा डझन हापूस आंबे राहत असल्याचे दिसून येते. हापूस आंब्याचा खरा मोसम एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात सुरू होण्याची शक्यता असून तो जून माध्यान्हापर्यंत राहणार आहे. विशेष म्हणजे कोकणात सध्या काही हापूस आंब्यांना मोहर धरत असल्याचे दिसून येते आहे.