अचानक वाढलेले तापमान कोकणातील हापूस आंब्याच्या वाढीला पूरक ठरल्याने कोकणातील हापूस आंबा घाऊक बाजारात विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणात येत आहे. गुरुवारी बाजारात साडेतीन हजार पेटय़ांची आवक झाली असून पुढील आठवडय़ात ती पाच ते सहा हजार पेटय़ांचा पल्ला गाठेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बाजारात कोकणातील हापूस आंब्याबरोबरच दाक्षिणांत्य हापूस व इतर काही प्रकारच्या आंब्याची आवक होत आहे.

फळ बाजारातील आर्थिक गणित सुधारवण्याचे व बिघडविण्याची ताकद असलेल्या कोकणातील हापूस आंब्याची मुंबईच्या घाऊक बाजारात मोसमातील रेलचेल वाढली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्य़ांतून सध्या सरासरी दोन ते तीन हजार हापूस आंब्याच्या पेटय़ा बाजारात येत आहेत. सर्वसाधारणपणे गुढीपाडव्यानंतर हापूस आंब्याची आवक मोठय़ा प्रमाणात सुरू होते. मात्र व्यापारी स्पर्धेच्या या युगात हापूस आंब्याची यंदा लवकर आवक सुरू झाली आहे. मोसमातील पहिला हापूस आंबा तर चक्क डिसेंबर महिन्यात मुंबई पुणे बाजारात दाखल झाला होता. मध्यंतरी पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे हापूस आंब्याचे यंदा गणित कोलमडून जाते की काय, अशी भीती बागायतदार व व्यापाऱ्यांमध्ये होती पण फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पडलेली थंडी आणि माध्यान्हापासून सुरू झालेला कडाक्याचा उन्हाळा यामुळे हापूस आंबा तयार होऊ लागला आहे. मागणी आणि पुरवठा यात सध्या तफावत असल्याने हापूस आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात अद्याप आलेले नाहीत. बऱ्यापैकी आकार असलेला हापूस आजही एक हजार रुपये प्रति डझन असून सर्वात छोटा हापूस ३०० ते ४०० रुपये प्रति डझन आहे. कोकणातील हापूस आंब्याबरोबरच कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दक्षिण भारतातील हापूस आंब्याने यंदा मुंबईच्या बाजाराचा चांगलाच ताबा घेतला आहे. या आंब्याच्याही अडीच हजार पेटय़ा तुर्भे येथील फळ घाऊक बाजारात दाखल होत आहेत. याशिवाय गरिबांचा हापूस म्हणून ओळखला जाणारा बदामी, तोतापुरी, लालबाग या आंब्याची आवकही वाढली आहे.

आखाती देशातील निर्यातीला सुरुवात

कोकणातील हापूस आंब्याचा खरा ग्राहक हा आखाती देश आहेत. त्यामुळे मोसमातील सर्वाधिक निर्यात ही आखाती देशात विशेषत: दुबईत केली जाते. हापूस आंब्याची आवक वाढली असून त्यातील पत चांगली असल्याने हापूस आंबा या आठवडय़ापासून दुबईत निर्यात केला जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ही निर्यात सध्या शंभर-दोनशे पेटय़ांपर्यंतच मर्यादित आहे.

 

हापूस आंब्यासाठी बागायतदार-व्यापारी बैठक

हापूस आंब्याचे उत्पादन, फवारणी, औषधे, मार्केटिंग, बागायतदारांच्या समस्या, अडचणी आणि कोकणातील हापूस जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टीने रत्नागिरीतील बागायतदारांनी मुंबई-पुण्यातील व्यापाऱ्यांबरोबर एका संयुक्त बैठकीचे आयोजन शनिवारी, २५ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आले आहे.