सिडको वसाहतींमध्ये रोजच निर्जळी; पाणी नियोजनात अंमलबजावणीचा अभाव
पेशवेकालीन विहिरी, तलावांचे शहर आणि स्वत:च्या मालकीचे धरण असूनही पनवेल शहरातील नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. जून महिन्यापर्यंत शहरी रहिवाशांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. ग्रामीण पनवेलमधील ग्रामस्थ विंधण विहिरी व विहिरींतील तळ गाठलेल्या पाण्याने तहान भागवीत आहेत. करंजाडे, कामोठे, खारघर आणि तळोजा या सिडको वसाहतींना बाळगंगा धरणातून पाणी मिळालेले नाही.
पनवेलमध्ये पाणीकपातीचा आकडा वाढत असतानाही नगरपालिकेने देहरंग धरणात साचलेल्या चिखलातील गाळाला काढण्याच्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही. यात राजकीय पुढाऱ्यांनीही गांभीर्याने लक्ष घातलेले नाही. मतांच्या पेटीचे वजन कसे वाढेल, याकडेच साऱ्यांचे लक्ष आहे.
नगर परिषदेने शहरात विहिरींचे पाणी बांधकामांना वापरण्याचे ठरवले आहे. त्यानंतर विहिरी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली, मात्र आजही या विहिरींचे पाणी बांधकामांना कोण आणि किती वापरतो, याचा तपशील नगरपालिका जाहीर करू शकलेली नाही. अशीच काहीशी अवस्था उदंचन केंद्रातून वाया जाणाऱ्या पाण्याची आहे. नगर परिषदेने ऐन पाणीटंचाईवेळी उदंचन केंद्रातून वाया जाणारे पाणी शौचायलाच्या स्वच्छतेसाठी, बागांसाठी वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले. मात्र नगर परिषदेने नवीन इमारतींना परवानगी देताना हे पाणी स्वच्छतागृहांसाठी वापरण्यासाठी बंधनकारक केल्यास ते योग्य होते असे नागरिकांचे मत बनले. दोन महिन्यांच्या पाणीटंचाईसाठी सामान्यांनी गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये वेगळ्या जलवाहिन्या टाकण्याचा खर्च करणे नागरिकांना परवडणारा नसल्याने हे नियोजन फसले. सध्या नगर परिषदेचे सदस्य हौदावरून पाण्याचा भरलेला टँकर प्रभागातील मागणी असलेल्या सोसायटीत कसा पोहोचेल, यासाठी पळापळ करताना दिसत आहेत.

लोकसंख्या वाढीचा फटका
पनवेल शहराची आजमितीची लोकसंख्या १ लाख ३२ हजार आहे. दिवसाला येथील रहिवाशांना २८ एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र पाणीटंचाईमुळे १८ एमएलडी पाण्याने येथील रहिवाशांना दिवसाआड पाणी पुरविले जाते. आजमितीला देहरंग धरणात १५० ते पावदोनशे दशलक्ष लिटर पाणी आहे. ते ७ जूनपर्यंत येथील नागरिकांना पुरविण्यासाठी आरक्षित केले आहे. देहरंग धरणातून फेब्रुवारीपर्यंत दिवसाला १० दशलक्ष लिटर पाणी पनवेलकरांना मिळत होते. या धरणाची प्रत्यक्षात क्षमता २.७ दशलक्ष घन मीटर (२७०० दशलक्ष लिटर) एवढी आहे. सध्या देहरंग धरणासोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) १० व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) ८ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. उपाययोजनेसाठी नगरपरिषदेने केंद्राच्या अमृत योजनेत सहभाग घेतला असून त्यासाठी ५०.५० कोटींचा कृती आराखडा मंजूर झाला असल्याची माहिती पनवेल नगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी डी. आर. अलगट यांनी दिली.
या योजनेनुसार न्हावा-शेवा वाढीव पाणीपुरवठा योजनेमध्ये नगर परिषद सहभागी होऊन त्यातील १७५ एमएलडी पाण्यापैकी २० एमएलडी पाणी पनवेलकरांना मिळणार आहे. यासाठी योजनेतील २६.५० कोटी रुपये लागणार आहेत. उर्वरित २३.५० कोटी रुपयांमध्ये शहरातील नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम, जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम तसेच शहरात बसआगार, जुना गंगाराम थिएटर, मार्केट यार्ड, हरिओम नगर, एचओसी कॉलनी येथे ५ जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील पाणीपुरवठय़ाची साठवणूक क्षमता वाढेल आणि वितरण व्यवस्था सुरळित होईल. मात्र हे प्रत्यक्षात सर्व उपाययोजना होण्यासाठी २ वर्षे लागतील. देहरंग धरणाची उंची १५ ते २० मीटर वाढविल्यास ८५ एमएलडी पाणी धरणात नव्याने जमा होऊ शकेल. त्यामुळे पनवेलकर पाण्याने संपन्न होतील, मात्र या उंचीमुळे धरणाच्या परिसरातील ४ वाडय़ा, ४ वस्त्यांचे पुनर्वसन करावे लागेल. सुमारे २२० एकर जमीन पाण्याखाली जाणार असल्याने तेथील स्थानिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा लागेल. यासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च आहे, असे अलगट यांनी स्पष्ट केले.

सिडको वसाहतींमध्ये सध्याची पाणीटंचाईची स्थिती ४४ दशलक्ष लिटर पाण्याची तूट आहे. सिडकोने उपाययोजना म्हणून हेवटणे धरणातून होणाऱ्या जिते येथील पाणीपुरवठा उपकेंद्रातील पंप बदलण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे ३ महिन्यांत १० एमएलडी पाणी वाढेल. करंजाडे करांना येत्या १२ दिवसांत जलवाहिनीतून पाणीपुरवठा होईल. तसेच कामोठे वसाहतीसाठी स्वतंत्र एमआयडीसीकडून जोडणी आसूडगाव येथून घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खांदेश्वर मंदिराजवळून ७०० मीटर जलवाहिनी टाकायचे काम सुरू होईल. खारघर वसाहतीला हेटवणे धरणातून थेट जलवाहिनीचे काम सुरू आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने हे काम थांबले आहे.
– दिलीप बोकाडे, सिडको पाणीपुरवठा विभाग, कार्यकारी अभियंता